नागपूर प्रतिनिधी
कॉंग्रेसच्या काळात रुग्णांना, कर्जबाजारी व्हावे लागत होते. मात्र, भाजप सरकारने देशातील गरिबांसाठी आरोग्यदायी वैद्यकीय प्रकल्प उभारले.
देशातील सात कोटी रुग्णांवर मोफत उपचाराची सोय भाजप सरकारने केली, अशा शब्दात कॉंग्रेसवर शरसंधान साधत सरकारच्या आरोग्यावर केलेल्या खर्चाची आकडेवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडली.नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या ‘स्वस्ती निवस’च्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.
जगात मोठ्या प्रमाणावर तोंडाचा कर्करोग आढळणारा देश म्हणून भारताकडे बघितले जाते. गर्भाशयाच्या मुख कर्करोगामुळे देशात प्रत्येक आठ मिनिटाला एकाचा मृत्यू होतो. काही वर्षांपूर्वी कॅन्सर हा दुर्धर आजार समजला जात होता. मात्र, आता देशभरात अनेक चांगल्या कॅन्सर इन्स्टिट्यूट स्थापना झाल्या आहेत.
त्यापैकी नागपुरातील कॅन्सर इन्स्टिट्यूट असून मध्यप्रदेश, तेलंगण, छत्तीसगड, महाराष्ट्रातील रुग्णांसाठी ते वरदान आहे. या इन्स्टिट्यूटला केंद्राकडून सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन शहा यांनी यावेळी दिले.

सादर केलेली आकडेवारी
भाजप व कॉंग्रेसच्या काळातील आरोग्यावरील तरतुदीची आकडेवारीच सादर करताना शहा म्हणाले, कॉंग्रेसच्या डॉ. मनमोहन सिंह यांच्या अखेरच्या अर्थसंकल्पात आरोग्यासाठी ३७ हजार कोटींची तरतूद होती.
सात कोटी कर्करुग्णांवर देशात मोफत उपचार
मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती वाढवून १ कोटी ३५ लाखांवर नेली. स्वातंत्र्यापासून कॉंग्रेसच्या काळात देशात फक्त ११ एम्स होते. भाजप सत्तेवर आल्यानंतर ११ वर्षांत देशात २३ एम्स रुग्णालयांना मंजुरी देण्यात आली. २०१४ पर्यंत देशात ३८७ मेडिकल कॉलेज होते. ते भाजपच्या काळात ७८० झाले. एमबीबीएस डॉक्टरांची संख्या ५१ हजार होती. ती १ लाख १८ हजारांवर पोचली आहे. पदव्युत्तर डॉक्टर ३१ हजार होते. निवासी डॉक्टरांची संख्या ७४ हजारांवर पोचली आहे.
निःस्वार्थ सेवेची भावना महत्त्वाची
ज्या संस्थांमध्ये कर्मठ लोक, समाजाप्रती सेवाभाव आणि रुग्णांबाबत निःस्वार्थ सेवेची भावना असणाऱ्या संस्था मोठ्या होतात असे शहा म्हणाले. आपण देशभरात अनेक संस्था विकसित होताना बघितल्या आहेत. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट त्यापैकी एक आहे. आगामी काळात ही संस्था देशातल्या प्रमुख कॅन्सर इन्स्टिट्यूट पैकी एक असेल यात शंका नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे सीईओ शैलेश जोगळेकर यांच्या जीवनात कॅन्सरमुळे दुःखद प्रसंग घडले. परंतु, त्यांनी आपल्या दुःखाचे रूपांतर समाजसेवेत करून त्याचा लाभ लाखो लोकांना व्हावा या भावनेने ही संस्था उभारली. अशी सेवाभावी वृत्ती फार कमी लोकांमध्ये असते, असे गौरवोद्गार शहा यांनी काढले.
या भूमिपूजन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार समीर मेघे, संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुनील मनोहर, उपाध्यक्ष अजय संचेती, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर, कोषाध्यक्ष आनंद औरंगाबादकर, वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक, परनो रिको इंडियाचे जॉन तुबुल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी शहा यांनी संस्थेच्या पाहणी केली. प्रास्ताविक शैलेश जोगळेकर यांनी केले.


