
मुंबई प्रतिनिधी
राज्यभरात सुरु असलेल्या “नशा मुक्त महाराष्ट्र” अभियानांतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत मेफेड्रॉनसारखा घातक अंमली पदार्थ जप्त केला आहे. मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत एकाचवेळी केलेल्या कारवायांमध्ये एकूण २४ कोटी ८२ लाख रुपये किमतीचा सुमारे १२ किलो ६६६ ग्रॅम मेफेड्रॉन, तसेच त्याच्या उत्पादनासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, एआरए मिल कंपाउंड, आग्रीपाडा, मुंबई येथे छापा टाकून संशयित आरोपीकडून १६४ ग्रॅम मेफेड्रॉन व ७ लाख ३५ हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हे मुंबईतील विविध ठिकाणी मेफेड्रॉनचा साठा करून विक्री करत होते. यानंतर १५ एप्रिल रोजी नवी मुंबईतील घणसोली येथे छापा टाकून १० किलो ६६ ग्रॅम मेफेड्रॉन व त्यासंबंधित साहित्य हस्तगत करण्यात आले.
या प्रकरणात आणखी तपास करत असताना पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील कोलाड परिसरातील शेतजमिनीत मेफेड्रॉन निर्मितीचा कारखाना उघडकीस आणला. तेथून उत्पादनासाठी वापरण्यात येणारे साहित्य, ९० लाख रुपये किंमतीचा साठा, आणि तयार अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.
या सर्व कारवायांमध्ये एकूण २४,८२,६०,००० रुपये किमतीचा मेफेड्रॉन व उत्पादन साहित्य जप्त करण्यात आले असून, सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. यान कारवाईचे नेतृत्व पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय, सह आयुक्त अमोल तांबे, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे उप पोलीस आयुक्त अजय भाटी आणि त्यांच्या पथकाने केले.
पोलीस प्रशासनाने जनतेला आवाहन केले आहे की, अशा अंमली पदार्थांच्या व्यापाराविषयी माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.