
पुणे प्रतिनिधी
पुण्यातील मुळशी येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आज पोलिसांनी मोठी कारवाई केली . या प्रकरणात फ्राय असलेले वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि तिचा दीर सुशील हगवणेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
सात दिवसांनंतर या आरोपींना अटक करण्यात आली आहे. १७ तारखेला गुन्हा दाखल झाल्यापासून दोघेही फरार होते. सात दिवस ते पोलिसांना चकवा देत होते. सतत लोकेशन बदलत होते. अखेर आज बावधन पोलिसांनी दोघांना स्वारगेट परिसरातून अटक केली. या दोघांच्या अटकेच्या थराराची माहिती समोर आली आहे. दोघेही ७ दिवस वेगवेगळ्या हॉटेलवर राहिले आणि त्यांनी आलिशान कारमधून प्रवासही केला.
सुशील हगवणे आणि राजेंद्र हगवणे यांनी १७ तारखेपासून कसा प्रवास केला याची सविस्तर माहिती समोर आली आहे. १७ तारखेला दोघेही एका आलिशान इंडीवर कारमधून राजेंद्र हगवणे औंध हॉस्पिटलला गेले. त्यानंतर थार या कारमधून ते मुहूर्त लॉन्स येथे गेले. नंतर याच कारमधून वडगाव मावळकडे त्यांनी प्रवास केला. पुढे पवना डॅमकडे रवाना झाले. तिथेच एका फार्म हाऊसमध्ये त्यांनी मुक्काम केला. त्यानंतर थार कारमधून आळंदी येथे गेले आणि एका लॉजवर मुक्काम केला.
त्यानंतर १८ मे रोजी थार याच कारमधून ते वडगाव मावळ येथे गेले. वडगाव मावळ येथे बंडू फाटक यांच्याकडे ते बलेनो या कारमधून गेले. १९ तारखेला पुसेगावच्या दिशेने दोघेही रवाना झाले. पुसेगाव येथील अमोल जाधव यांच्या शेतावर हे दोघेही गेले होते. त्यानंतर पसरणी मार्गे कोगनोळी येथे १९ आणि २० तारखेला त्यांनी हॉटेल हेरिटेज येथे मुक्काम केला. त्यानंतर पुढे २१ आणि २२ तारखेला प्रीतम पाटील या मित्राच्या शेतावर त्यांनी मुक्काम केला.
त्यानंतर २२ मे रोजी रात्री ते पुण्याच्या दिशेने रवाना झाले आणि पुण्यातील मुहूर्त लॉन्स या ठिकाणी ते गेले. त्याठिकाणचे जेवतानाचे त्यांचे सीसीटीव्ही व्हिडीओ पोलिसांना मिळाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ते तिथेच असल्याच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आणि संपूर्ण परिसराची झडती घेतली. अखेर पहाटे साडेपाच वाजता बावधन पोलिसांनी दोघांनाही अटक केली.