
सातारा प्रतिनिधी
माजी मंत्री (कै.) अभयसिंहराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त कर्तव्य सोशल ग्रुप, सायन हॉस्पिटल, क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय, छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील दीड महिना ते १५ वर्षांपर्यंतच्या ९६ बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
या शिबिरासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुढाकार घेतला होता.
या शस्त्रक्रिया करण्यासाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले यांच्या आवाहनानुसार मुंबई येथील पेडीयाट्रिक सर्जन डॉ. संजय ओक, डॉ. पारस कोठारी, डॉ. आमीर खान, डॉ. आदिती दळवी, डॉ. सुकन्या विंचूरकर, डॉ. क्षितिजा पोखरकर, डॉ. मेहता, डॉ. रुचिता शहा आदी सर्व तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ”आजच्या बालकात उद्याच्या नव्या भारताचा आश्वासक चेहरा आहे. या चेहऱ्यावर चिंता नको, आत्मविश्वास हवा.” सुदृढ बालक हीच देशाची संपत्ती असल्याचे सांगत त्यांनी वैद्यकीय तज्ज्ञांचे आभार मानले.
यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थित पालक व रुग्णांशी चर्चा केली. कर्तव्य ग्रुपच्या माध्यमातून नवी मुंबईत गेल्या महिन्यात १५ मुलांच्या मोफत हृदयशस्त्रक्रिया तसेच मोतीबिंदू मुक्त सातारा विधानसभा मतदारसंघानुसार पुणे व सांगली येथे ८५ जणांवर शस्त्रक्रिया देखील झाल्या आहेत. यापुढील काळातही अशीच समाजउपयोगी आरोग्य शिबिरे आयोजित करणार असल्याची माहितीही वेदांतिकराजे भोसले यांनी या वेळी दिली.