
सातारा प्रतिनिधी
आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजना एकत्रित करण्यात आल्या असून, या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य संरक्षण प्रदान करण्यात येत आहे. या योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे आयुष्मान भारत कार्ड काढण्याच्या दृष्टीने मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, पोलीस उपअधीक्षक (गृह) अतुल सबणीस, तसेच खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
“रुग्णालयांचा सहभाग वाढविण्यावर भर”
जिल्ह्यातील अधिकाधिक रुग्णालयांनी या योजनांमध्ये सहभागी व्हावे, अशी सूचना डॉ. शेटे यांनी केली. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत नागरिकांचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी आवश्यक असलेल्या डाटा एन्ट्री ऑपरेटरच्या रिक्त पदांची तातडीने भरती करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
स्त्रियांच्या आरोग्याला प्राधान्य
स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष लक्ष देण्याचे निर्देश देताना त्यांनी सांगितले की, कर्करोग झालेल्या कोणत्याही स्त्रीला प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभ मिळालाच पाहिजे. कोणतीही स्त्री उपचारांपासून वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी.
निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेष शिबिरे
पोलीस विभागातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठीही आयुष्मान कार्ड काढण्यात यावे, यासाठी पोलीस विभागाशी समन्वय साधून शिबिरे आयोजित करावीत, असे निर्देशही त्यांनी दिले.
प्रसिद्धी व जनजागृतीसाठी उपाय
१८००२३३२२०० / १५५३८८ या टोल फ्री क्रमांकासह दोन्ही योजनांतील लाभ व उपचारांची माहिती रुग्णालयाच्या बाहेरील फलकांवर आणि ग्रामपंचायतीच्या ठिकाणी प्रदर्शित करावी, असेही सांगण्यात आले.
‘वैद्यकीय महाविद्यालयाच्या निधीसाठी पाठपुरावा’
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तिसऱ्या टप्प्यातील कामासाठी निधी आणि अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या खरेदीसाठी प्रस्ताव सादर करावा, त्यासाठी आवश्यक निधीसाठी पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही डॉ. शेटे यांनी दिली.