
ठाणे प्रतिनिधी
गोवा निर्मित भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची ठाण्यात बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनावर ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक एकने मोठी धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल ८०० बॉक्स मद्यासह एक टेम्पो असा सुमारे ६३,९८,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई शुक्रवार, १६ मे रोजी सायंकाळी ५.१५ वाजता मुंब्रा येथील अमित गार्डनजवळ करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार, अधीक्षक प्रविण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने ही कारवाई पार पाडली.
टाटा १६१३ सहाचाकी टेम्पो (MH-05-AM-1265) ची तपासणी केली असता, त्यामध्ये गोव्यातून ठाण्यात आणलेले विदेशी मद्य सापडले. अवैध वाहतूक होत असलेल्या या मद्यसाठ्याची बाजारमूल्य ६४ लाख रुपयांच्या घरात असल्याचे समजते.
या प्रकरणी वाहनचालक जुल्फेकार ताजअली चौधरी याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास निरीक्षक महेश धनशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. या कारवाईत निरीक्षक एम.पी. धनशेट्टी, दुय्यम निरीक्षक एन.आर. महाले, आर.के. लब्दे, सहाय्यक दु.नि. बी.जी. थोरात तसेच इतर अधिकारी सहभागी होते.
ठाणे विभागातील बेकायदेशीर मद्य वाहतुकीविरोधातील ही मोठी कारवाई मानली जात असून, आगामी काळात अशा प्रकारच्या कारवायांना आणखी वेग मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.