
मुंबई प्रतिनिधी
मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (NDPS), परिमंडळ ०६ व शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत तब्बल ६.१९ कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत एक आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथक प्रमुख स.पो.नि. मैत्रानंद खंदारे यांना १३ मे रोजी त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, गोवंडीतील रजा चौक परिसरातील कमलारमन नगर झोपडपट्टीत सलमान शेख नावाचा इसम आपल्या साथीदारासह मोठ्या प्रमाणावर एम.डी. (मेफेड्रोन), गांजा व कोडीन फॉस्फेटयुक्त ओनोरेक्स बॉटल्स विक्री करीत आहे.
सदर माहितीच्या आधारे स.पो.नि. खंदारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने, शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पो.नि. प्रमोद पवार, स.पो.नि. राजवर्धन खेबुडे व त्यांच्या सहकाऱ्यांसह मिळून त्या ठिकाणी छापा टाकला. कारवाईदरम्यान संबंधित घरातून ३ किलो ७८ ग्रॅम एम.डी. (कींमत: ₹६.१५ कोटी), १२ किलो गांजा (कींमत: ₹२.४० लाख), ३६ नग ओनोरेक्स बॉटल्स (कींमत: ₹१८ हजार) आणि ₹१.३० लाख रोख रक्कम असा एकूण ₹६.१९ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपी सलमान इजहार शेख (वय २३) याच्याविरोधात शिवाजी नगर पोलीस ठाण्यात NDPS कायद्याच्या कलम ८(क), २२(क), २०(ब), २९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास परिमंडळ ०६ अंमली पदार्थ विरोधी पथक करत आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त .सत्यनारायण चौधरी,अप्पर पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील, पोलीस उपआयुक्त नवनाथ ढवळे, तसेच सहाय्यक आयुक्त आबूराव सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी – स.पो.नि. खंदारे, स.पो.नि. खेबुडे, पो.हवा पिंजारी, पो.शि. सहाने, केदार, माळवे, सानप व राउत यांनी सक्रिय सहभाग घेतला.
मुंबई पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील अंमली पदार्थांच्या विक्रीला मोठा आळा बसला आहे.