
डहाणू प्रतिनिधी
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सोमवार १२ मे रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास मेंढवण गावाच्या हद्दीत एका प्रवासी वाहनाला मालवाहू कंटेनर ने धडक दिल्यामुळे या भीषण अपघातात एकजण ठार सहा जण़ जखमी झाले आहेत..
गुजरात वाहिनीवर प्रवास करणाऱ्या कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे वाहन मुंबई वाहिनीवर येऊन प्रवासी वाहनाला धडकून भीषण अपघात झाला आहे. अपघातात एकाचा मृत्यू झाला असून इतर सहा जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये चार लहान मुलांचा समावेश आहे.
भिवंडी येथील भैरी कुटुंब गुजरात बाजूने मुंबई कडे जात असताना मेंढवण हद्दीत गुजरात बाजूला जाणाऱ्या एका कंटेनर वरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कंटेनर रस्त्याच्या मधील सुरक्षा रक्षक कठडा ओलांडून मुंबई वाहिनीवर येत भैरी कुटुंबाच्या गाडीला धडकून उलटले. या भीषण अपघातात प्रवासी वाहनामधील ३५ वर्षीय चालकाचा मृत्यु झाला असून त्याचे नाव अद्याप समजलेले नाही. तर श्रीनिवास भैरी (४०), स्पंदना भैरी (१७) हे दोघे गंभीर जखमी झाले असून भविका भैरी (०४), विहान केथम (११), जशीत भैरी (११), गौतमी भैरी (३७) हे चार जण जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी अपघातग्रस्तांचा मदतीसाठी धाव घेतली असून महामार्ग प्रशासन आणि पोलिसांना माहिती दिली. स्थानिक पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना तत्काळ उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. कासा उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी सेलवास येथील रुग्णालयात पाठवल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. तसेच महामार्ग पोलिसांनी अपघात ग्रस्त वाहन बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली आहे. या अपघात प्रकरणी कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांनी दिली.