
स्वप्नील गाडे|प्रतिनिधी
मुंबई| वांद्रे येथील कलानगर परिसरात महिला नागरिकाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पलायन करणाऱ्या आरोपीला खेरवाडी पोलिसांनी अटक केली आहे. रोहित संतोष धोबी (वय अंदाजे २८) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, तो सोनसाखळी चोरीप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या अटकेनंतर दोन गुन्ह्यांचा यशस्वी तपास झाला असून, एकूण १.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
३० एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्रिवेणी वासु सालियन या महिला चेतना कॉलेजसमोरील रस्त्यावरून जात असताना बाईकवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किंमतीची सोनसाखळी हिसकावून पळ काढला होता. या प्रकरणी खेरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत सोमवारी वांद्रे येथून रोहित धोबी याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, यापूर्वी विलेपार्ले परिसरातही त्याने असाच गुन्हा केल्याची माहिती समोर आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक कविदास जांभळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली बाईक, मोबाईल, चोरलेली सोनसाखळी आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईसाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंग दहिया, पोलीस उपायुक्त कलवानिया, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रदीप लोंढे, ब्रिजेश पवार, श्याम ठाकरे, शिवा सरोदे, गणेश ठोंबरे, या पथकाने ही कामगिरी केली.
आरोपीस वांद्रे येथील स्थानिक कोर्टात हजर करण्यात आले असून, कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या अटकेनंतर इतर काही चोरीप्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता आहे, असे पोलिसांनी सांगितले.