
मुंबई प्रतिनिधी
मुंबई| मुंबई पोलिसांच्या अंमलीपदार्थविरोधी पथकाने परदेशातून हवाई मार्गाने तस्करी करून मुंबईत आणलेला सुमारे दोन कोटी रुपये किंमतीचा उच्च प्रतीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी वीरू ठाकूर (वय ४७) याला अटक करण्यात आली असून, गांजाची ही खेप पश्चिम उपनगरातील उच्चभ्रू वसाहतींमध्ये विक्रीसाठी नेली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गांजा बँकॉक, मलेशिया, थायलंड आदी देशांतून आलेल्या प्रवाशांमार्फत तस्करांपर्यंत पोहोचवण्यात आला. या प्रवाशांनी आपल्या सामानात, विशेषतः कॉर्नफ्लेक्सच्या डब्यांमध्ये हा गांजा लपवून मुंबई विमानतळावर आणला होता. यानंतर तो अंधेरीतील लोखंडवाला परिसरात पोहोचवण्यात आला होता.
अंमलीपदार्थविरोधी पथकाच्या घाटकोपर विभागाचे प्रभारी निरीक्षक अनिल ढोले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एक पथक तातडीने अंधेरीत रवाना झाले. निरीक्षक पाटील, सहायक निरीक्षक खोलम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून वीरू ठाकूर याला अटक केली. त्याच्याकडून दोन किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे.
हा गांजा वांद्रे, खार, सांताक्रूझ, विलेपार्ले, ओशिवरा या भागांतील उच्चभ्रू वर्गातील ग्राहकांसाठी आणण्यात आल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. या ग्राहकांमध्ये श्रीमंत व्यावसायिक, उद्योगपतींची मुले तसेच बॉलीवूडमधील काही कलाकारांचाही समावेश असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हायड्रोपोनिक गांजा हा विशिष्ट पद्धतीने नियंत्रित वातावरणात पिकवला जातो आणि सामान्य गांजाच्या तुलनेत अधिक महाग असतो. त्यामुळे तो श्रीमंत वर्गात लोकप्रिय आहे. या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय तस्करीचे जाळे सक्रिय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, पुढील तपास सुरू आहे.