भिवंडी (प्रतिनिधी)
भिवंडी शहरातील फेणे गावात घडलेल्या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पती रात्रपाळीसाठी कामावर गेलेला असताना पत्नीने आपल्या तीन चिमुरड्यांसह गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.
फेणे गावातील चाळीत लालजी बनवारीलाल भारती (यंत्रमाग कामगार) पत्नी पुनिता (वय ३२) व तीन मुली – नंदिनी (१२), नेहा (०७) आणि अनु (०४) यांच्यासह राहत होता. लालजी शनिवारी रात्री रात्रपाळीसाठी कामावर गेला होता. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास तो घरी परतला असता घराचा दरवाजा आतून बंद होता. प्रतिसाद न मिळाल्याने त्याने खिडकीतून आत डोकावले असता त्याला पत्नी व मुलींचे गळफास घेतलेले मृतदेह दिसले.
हतबल झालेल्या लालजीने दरवाजा उघडून आरडाओरड केली. शेजाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. भिवंडी शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी, बीट मार्शल व महिला अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
घटनास्थळी “आमच्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये” अशी चिठ्ठी मिळाली असून, यामुळे आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.


