
मुंबई प्रतिनिधी
गेल्या एक आठवड्यापासून मुंबई पोलीस आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू असतानाच आता मुंबई पोलिस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विवेक फणसळकर आज मुंबई पोलिस आयुक्तपदावरून आज 30 एप्रिल 2025 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. आता देवेन भारती यांच्याकडे मुंबई पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
मुंबई पोलिस आयुक्तपदासाठी सदानंद दाते, संजयकुमार वर्मा, देवेन भारती, रितेश कुमार, महिला पोलीस अधिकारी अर्चना त्यागी यांच्या नावाची चर्चा होती. यात देवेन भारती यांनी बाजी मारली आहे.
कोण आहेत देवेन भारती ?
54 वर्षांचे देवेन भारती हे मूळचे बिहारमधील दरभंगा येथील आहेत. त्यांनी झारखंडमधून मॅट्रिक केले आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली. 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले देवेन भारती हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात.
देवेन भारती यांनी मुंबईत डीसीपी, झोन 9 आणि डीसीपी गुन्हे शाखा म्हणून काम केले आहे. ते राज्यातील पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) आणि महाराष्ट्र ATS चे प्रमुख देखील होते.
2014 ते 2019 पर्यंत देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना देवेन भारती हे पोलीस सहआयुक्त होते. परंतु ऑक्टोबर 2020 मध्ये महाविकास आघाडी सरकारने त्यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळमध्ये बदली केली.
हाय प्रोफाइल प्रकरणांचा तपास
देवेन भारती यांनी अनेक हाय प्रोफाइल प्रकरणांचा तपास केला आहे. राज्यात इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचं जाळं नष्ट करण्यासाठीही ते ओळखले जातात. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला, मिड डे वृत्तपत्राचे पत्रकार जे. डे यांची हत्या या प्रकरणांचा तपास त्यांनी केला आहे.