
गडचिरोली प्रतिनिधी
नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याच्या कटेझरी या अतिदुर्गम गावात २६ एप्रिलला लालपरी म्हणजेच एसटी बस सुरू करण्यात आली आहे. पोलिसांच्या सहकार्यामुळे सुरू झालेल्या या लालपरीचे वाजत गाजत गावकऱ्यांनी स्वागत केले.
स्वातंत्र्यानंतर ७८ वर्षांनी पहिल्यांदाच कटेझरी ते गडचिरोली बससेवा सुरू करण्यात आली आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नांमुळे ही सेवा शक्य झाली आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांनी बससेवेचे उद्घाटन केले. पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले यांनी हिरवा झेंडा दाखवून बस मार्गस्थ केली. या बससेवेमुळे परिसरातील १० ते १२ गावांतील नागरिकांना लाभ होणार आहे. विशेषतः विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी येण्या-जाण्याची सोय होणार आहे.
तसेच यापूर्वी १ जानेवारी २०२५ रोजी गट्टा ते गर्देवाडा आणि वांगेतुरी बससेवा सुरू करण्यात आली होती. मागील पाच वर्षांत दुर्गम भागात ४३४.५३ किलोमीटर लांबीचे १८ रस्ते आणि ५९ पुलांचे बांधकाम पोलीस संरक्षणात पूर्ण करण्यात आले आहे.