
कल्याण| एपीएमसी फुल मार्केट परिसरात केळीच्या पानांवरून झालेल्या वादातून एकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी ८.३० वाजता घडली. या प्रकरणी आरोपी विराग राजकुमार सोनी (२१, रा. शिवकृपा चाळ, पत्री पूल, कल्याण पूर्व) याला पोलिसांनी अवघ्या ३० मिनिटांत अटक केली.
मृत चमनलाल नंदलाल कारला (५५) व त्यांचा मुलगा कार्तिक यांच्यासोबत आरोपी विराग याचा वाद झाला होता. जळगावहून विक्रीसाठी आलेल्या केळीच्या पानांपैकी एक बंडल आरोपीचा व चार बंडल मृत चमनलाल यांचे होते. मृत व्यक्तीने आरोपीची परवानगी न घेता त्याचे बंडल विक्रीसाठी घेतल्याने वाद झाला.
बंडल मागणी केली असता, “में नहीं दूंगा, तेरे को जो करना है ओ कर” असे उत्तर मिळाल्याने संतप्त झालेल्या आरोपीने कात्रीने चमनलाल यांच्या छातीवर व पोटावर सपासप वार करून त्यांचा जागीच मृत्यू घडवून आणला. तसेच झगड्यात मध्यस्थी करणाऱ्या कार्तिक कारला व नितुदेवी कारला यांनाही आरोपीने कात्रीने जखमी केले.
ही घटना घडल्याच्या ३० मिनिटांतच पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली व बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश गाडवे, ज्ञानेश्वर गोरे, निसार तडवी व पोलीस शिपाई विशाल राठोड, अक्षय गिरी यांनी चक्कीनाका, कोळशेवाडी परिसरातून आरोपीला पकडले.
या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. २८१/२०२५ भा.दं.वि. कलम १०३(१), १०९, ११७(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) अन्वये नोंदविण्यात आली असून तपास पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आरोपीवर कठोर कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.