
जळगाव प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात ‘सैराट’ची पुनरावृत्ती घडली आहे. जळगावातील चोपडा शहरात एका सेवानिवृत्त सीआरपीएफ अधिकाऱ्याने आपल्याच मुलीची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या घटनेत तृप्ती अविनाश वाघ (२४) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिचा पती अविनाश वाघ यांच्या पाठीत गोळी घुसली आहे. ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जळगावच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी तृप्ती आणि अविनाश यांनी प्रेमविवाह केला होता. हा विवाह तृप्तीचे वडील किरण मंगले यांना मान्य नव्हता. अविनाशच्या बहिणीच्या हळदी समारंभासाठी तृप्ती आणि अविनाश चोपडा येथे आले होते. किरण मंगले यांना मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात होता. हाच राग मनात धरून आलेल्या किरण मंगले यांनी तृप्ती आणि अविनाश यांच्यावर गोळीबार केला. त्यांनी तीन राउंड फायर केले. यात तृप्तीचा जागीच मृत्यू झाला. तर अविनाश यांच्या पाठीला गोळी लागली. तर दुसरी गोळी हाताला लागल्याने ते गंभीर जखमी झाले.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. तृप्तीचे वडील किरण अर्जुन मंगले हे सीआरपीएफचे निवृत्त अधिकारी आहेत. त्यांनी त्यांच्या परवाना असलेल्या बंदुकीचा वापर करुन हा गोळीबार केला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी किरण मंगले यांना बेदम मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जळगावातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच यानंतर अविनाशलाही जळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शहरात उडाली खळबळ
याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी किरण यांनी या गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल जप्त केली आहे. जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या घटनेची माहिती दिली आहे. या घटनेमुळे चोपडा शहरात खळबळ उडाली आहे. तसेच वाघ यांच्या घरावर शोककळा पसरली आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.