
मुंबई प्रतिनिधी
या वर्षी कमी लग्नतिथी आहेत. मे, जून, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांमध्ये केवळ 26 लग्नतिथी आल्या. यंदा अक्षय्य तृतीयेलाही विवाहाची तिथी आहे. डिसेंबरपर्यंत शुभमंगल उरकून घ्यावे लागणार आहे; अन्यथा 2026 ची वाट बघावी लागणार आहे.
उपवरांचे आई-वडील, पालक आणि विवाहेच्छुक उपवर तुळशी विवाह होण्याची वाट पाहतात. तुळशी विवाहानंतर लग्नाचा बार उडवून देण्यासाठी सर्व जण मोकळे होतात. यंदा लग्नाच्या फारशा तिथी नाहीत. वेदशास्त्रसंपन्न रामकृष्ण बारहाते (बाणेगावकर) म्हणाले, ”यंदा लग्नाच्या फार तिथी नाहीत. वैशाखात म्हणजेच मे महिन्यात 14 तिथी आहेत.
जूनमध्ये ४, त्यानंतर नोव्हेंबरमध्ये ६ आणि डिसेंबरमध्ये २ लग्नतिथी आहेत. आठ जूननंतर गुरूचा अस्त असल्याने जुलैमध्ये लग्नाच्या तिथी नाहीत.
असे आहे महत्त्व
हिंदू धर्मामध्ये अक्षय्य तृतीयेचे विशेष असे महत्त्व आहे. याच दिवशी भगवान परशुराम यांची जयंतीही साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, त्रेता आणि सतयुगाची सुरवात ही अक्षय्य तृतीयेला झाली, म्हणून या तृतीयेला कृतयुगादी तृतीया असेही म्हटले जाते. या दिवशी दीर्घकाळ टिकणारी मालमत्ता, सोने खरेदी केले जाते. यावर्षी अक्षय्य तृतीयेलाही लग्नाची तिथी असल्याचे बारहाते यांनी सांगितले.
या आहेत लग्न तिथी
मे – १,५,६,७,८,९,१०,१३,१४,१६,१७,२०,२३,२४.
जून २,४,६,८.
नोव्हेंबर – २२,२३,२५,२६, २७,३०
डिसेंबर – २ व ५