
पुणे प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षानिमित्त चौंडीत होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
ती बैठक मुंबईतच होणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. 31 मे रोजी ही बैठक होणार होती.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या 300 व्या जयंतीचे निमित्त साधत त्यांचे जन्मस्थान असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील चोंडी येथे 31 मे रोजी कॅबिनेटची बैठक होणार होती. त्यासाठी राज्य मंत्रिमंडळातील 42 मंत्री आणि त्यांचा स्टाफ उपस्थित राहणार होता. या बैठकीच्या तयारीसाठी निविदाही काढण्यात आली होती. पण आता ही बैठक रद्द झाल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षानिमित्त अहिल्यादेवी होळकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याबाबतही चर्चा सुरू आहे. राष्ट्रीय स्मारकाचा बृहत आराखडा तयार करण्याच्या सूचनादेखील मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला दिलेल्या आहेत.