
मुंबई प्रतिनिधी
मुंबईकरांच्या वाढत्या पाणीटंचाईच्या समस्येवर आवाज उठवण्यासाठी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने महत्त्वपूर्ण आंदोलन करण्यात आले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांनी महापालिका विभागीय कार्यालयांवर “पाणी हक्काचा मोर्चा” काढण्याचे आवाहन केले होते.
त्याअनुषंगाने आज विभाग क्रमांक १० चे विभागप्रमुख आणि आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली जी-उत्तर विभाग कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. मोठ्या संख्येने शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र, या शांततामय लोकशाही आंदोलनावर पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करत मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला.
अशा प्रकारच्या दडपशाहीला न घाबरता, शिवसैनिकांनी मुंबईकरांच्या पाणी समस्येसंदर्भात महापालिका अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आणि ही समस्या तातडीने सोडवावी, अशी ठाम मागणी केली.
शिवसेनेच्या म्हणण्यानुसार, पाण्याच्या मूलभूत हक्कासाठी लढा देणाऱ्या नागरिकांचे आंदोलन रोखणे ही लोकशाहीची गळचेपी असून, प्रशासनाने जनतेच्या समस्या ऐकून घेत तातडीने उपाययोजना कराव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली.