
पुणे प्रतिनिधी
भूम तालुक्यातील आंदरूड गावात गुन्हेगारी क्षेत्रात दबदबा असणारा कुख्यात गुंड निलेश घायवळ याला मारहाण झाल्याची घटना घडली. आंदरूड गावात यात्रेनिमित्त भरवलेल्या कुस्ती स्पर्धेत हा प्रकार घडला.
आंदरूड येथील ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त ही स्पर्धा भरवण्यात आली होती. निलेश घायवळ यानेच ही स्पर्धा आयोजित केली होती. शुक्रवारी रात्री कुस्ती सुरु असताना निलेश घायवळ एका पैलवानाची भेट घ्यायला गेला. त्यावेळी अचानक दुसरा पैलवान घायवळच्या अंगावर धावून जात मारहाण केली.
निलेश घायवळवर हल्ला करणारा पैलवान कोण?
दरम्यान या घटनेनंतर हा तरुण पैलवान घटनास्थळावरुन पळून गेला होता. त्यामुळे तो नेमका कोण होता, हे स्पष्ट होऊ शकले नव्हते. काल रात्रीपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. या तपासादरम्यान निलेश घायवळ याला मारणाऱ्या तरुणाचे नाव समोर आले आहे. सागर मोहोळकर असं मारहाण करणाऱ्या तरुणाचं नाव असून तो अहिल्यानगर जिल्ह्यातील नानज गावचा रहिवासी आहे. सागर पेशाने पैलवान आहे. शुक्रवारी रात्री तो धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील आंदरुड गावच्या जत्रेला उपस्थित होता.
नेमकं काय घडलं?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भूम तालुक्यातील आंदरुड या गावात ग्रामदैवत जगदंबा देवीच यात्राउत्सव सुरू आहे. या यात्रेनिमित्ताने कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी निलेश घायवाळ आला होता. कुस्ती स्पर्धेत सहभागी झालेल्या एका पैलवानाची भेट घ्यायला घायवळ गेला. त्यावेळी अचानक एका पैलावान त्याच्या अंगावर येत कानशिलात लगावली.
यानंतर घायवळ याच्या समर्थकांनी देखील संबंधित पैलवानाला मारहाण केली असल्याचे समजते. मात्र, या मारहाणीचे कारण समजू शकलेले नाही. गावात आयोजित करण्यात आलेली कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक आले होते. मारहाणाच्या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
निलेश घायवळचा गुन्हेगारीचा आलेख
निलेश घायवळ हा मूळचा जामखेड तालुक्यातील सोनेगावचा रहिवाशी आहे. काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये शिक्षणासाठी आला होता. त्यावेळी निलेश घायवळ हा गजानन मारणे टोळीत होता. गजा मारणेसोबत त्याने एक खून केला होता. यामध्ये त्याला सात वर्षांची शिक्षा झाली होती. बाहेर आल्यावर घायवळ याने आपली वेगळी टोळी केली. त्यानंतर मारणे आणि घायवळचं टोळीयुद्ध पुण्याने पाहिलं. या टोळीत झालेल्या वादात घायवळ टोळीतील पप्पू गावडेचा खून मारणे टोळीने केला. त्यानंतर घायवळ टोळीने मारणेच्या टोळातील सचिन कुंडले याचा खून केला होता. त्यानंतर दोन्ही टोळीमधील गुंड आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी एकमेकांच्या जीवावर उठले होते.
“निलेश घायवळवर अनेक गुन्हे दाखल”
कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर मोक्का, खुन, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, खंडणी, दरोडा, गर्दी जमवून दंगा करणे, गंभीर दुखापत करणे, मारामारी असे गंभीर स्वरुपाचे एकूण दहा पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. मध्यंतरी निलेश घायवळ व त्याच्या साथीदारांविरुद्ध भिगवण पोलीस स्टेशनला अपहरण खंडणीचा गुन्हा दाखल झालेला होता.