
मुंबई प्रतिनिधी
विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा बडगा उगारला होता. एसटी कर्मचाऱ्यांची पगार रखडले असताना आता परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
आजच्या आज 120 कोटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होतील. कर्मचाऱ्यांना मंगळवारी पगाराची रक्कम मिळेल. 176 कोटींची मागणी केली होती. त्यातील 120 कोटी रक्कम आज मिळेल. वारंवार मागणी करावी लागू नये म्हणून 7 तारखेच्या आत सर्व पगार जमा होईल, असा निर्णय झालाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी हा प्रश्न लवकरात लवकर सोडवला.
काही त्रुटी तांत्रिक असतात. अधिकाऱ्यांनी काही तांत्रिक चुका केल्यायत. ऑडीट रिपोर्ट पाठवला नाही. पीएफचा एकही रुपया इतरत्र खर्च करु नये असे मी सांगितले. उर्वरित रक्कम 3 टप्प्यात देण्याचे वित्त विभागाने मान्य केलंय. पुढच्या महिन्यापासून 7 तारखेच्या आत पगार बॅंक खात्यात पोहोचेल, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी निश्चिंत रहावे, असे प्रताप सरनाईक म्हणाले.
तळागाळातील माणूस इथपर्यंत आलोय. मी 7-8 वर्षे रिक्षा चालवायचो. एकनाथ शिंदे आणि मी एकाच काळात रिक्षा चालवायचो. गरीबीतून आलेल्यांनाच हे प्रश्न कळतात, असे प्रताप सरनाईक म्हणाले. एसटी कर्मचा-यांच्या पगराबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. शासकीय कर्मचा-यांप्रमाणे एसटी कर्मचा-यांचाही पगार वेळेत व्हावा अशी मागणी त्यांनी केलीय.तसेच वेळेत पगार देण्याची जबाबदारी वित्त विभागाची असल्याचं प्रताप सरनाईकांनी म्हटलंय.सोबतच आपण पगाराची भीक मागत नसून तो आमचा हक्क असल्याचंही परिवहनमंत्र्यांनी म्हटलंय.
पगारावरुन महायुतीत श्रेयवाद?
एसटी कर्मचा-यांच्या पगारावरून आता अजित पवार आणि एकनाथ शिंदेंमध्ये श्रेयवाद सुरू झालाय.एसटी कर्मचा-यांच्या पगारावरुन शिंदे-पवारांमध्ये श्रेयवाद पाहायला मिळाला.
वेतनाच्या मुद्द्यावरुन वित्त खाते आणि परिवहन खात्यात विसंवाद आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला. एकीकडे एकनाथ शिंदेंनी वित्त सचिवांना फोन करुन वेतनाच्या मुद्द्यावर तोडगा काढल्याचं म्हटलंय. तर दुसरीकडे वेतनाचा प्रश्न परिवहन खाते आणि मुख्यमंत्र्यांसोबत बैठक करुन सोडवू असं अजित पवार म्हणाले