
मुंबई प्रतिनिधी
रामनवमीच्या पवित्र आणि शुभ दिवशी, मुंबई पोलिसांनी शहरभर कडक सुरक्षा बंदोबस्त उभा केला आहे. हा उत्सव शांततेत, सुरक्षिततेत आणि आनंदात पार पडावा यासाठी पोलिसांकडून व्यापक तयारी करण्यात आली आहे.
सुरक्षा व्यवस्थेअंतर्गत शहरभर मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यात २० डीसीपी, ५१ एसीपी, २५०० पोलिस अधिकारी आणि सुमारे ११,००० पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय, राज्य राखीव पोलिस दलाच्या ९ पलटण्या देखील सतर्कतेसाठी ठिकठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत.
विशेष लक्ष मालवणी परिसरात आहे, जिथे रामनवमी निमित्त भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, मालवणीत मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, स्थानिक पोलिस पथके परिसरात सातत्याने गस्त घालत आहेत.
मुंबई पोलिसांनी शहरातील नागरिकांना शांततेत व उत्साहात उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रकारची शंका, माहिती किंवा तक्रार असल्यास, नागरिकांनी तातडीने जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.