पुणे प्रतिनिधी
पुण्यात दिवसेंनदिवस गुन्हेगारीच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
नुकत्याच घडलेल्या एका धक्कादायक घटनेत, बाउन्सर म्हणून काम करणारे दोन वसुली एजंट्सने घरात घुसून मारहाण केली आहे.
या वसुली एजंट्सने थेट घरात घुसत शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलीच्या शिक्षणासाठी घेतलेल्या वैयक्तिक कर्जाचा एक ईएमआय चुकल्यामुळे हा सगळा प्रकार घडला.
वानवडीतील शांतीनगर येथील रहिवासी 46 वर्षीय मंगेश भुसारी यांनी 27 मार्च ला संध्याकाळी 6:30 वाजता वानवडी पोलिसात एफआयआर दाखल केला. तेव्हा ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
अटक केलेल्यांमध्ये पर्वतीमधील जनता वसाहत परिसरात राहणाऱ्या आकाश पुरुषोत्तम सापा (32), ऋषिकेश नागनाथ चंदनशिवे (26), बजाज फायनान्सचे व्यवस्थापक हर्षद झिमण यांचा समावेश आहे. व्यवसायाने बँकर असलेल्या भुसारी यांनी सांगितलं की, त्यांनी त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि वडिलांच्या वैद्यकीय खर्चासाठी बजाज फायनान्सकडून 7.73 लाख रुपयांचं पर्सनल लोन घेतलं होतं.
दरम्यान, दरमहा 18,070 रुपये हप्ता निश्चित करण्यात आला होता. तसंच विमा आणि प्रक्रिया शुल्कासाठी 43,000 रुपये आगाऊ कापले होते. त्यामुळे त्यांच्या खात्यात 6.85 लाख रुपये आले होते. भुसारी यांनी सांगितलं की, ते नियमितपणे हप्ते भरत होते. पण कुटुंबातील सदस्यांच्या वैद्यकीय खर्चामुळे एक हप्ता चुकला.
भुसारी म्हणाले, “वैद्यकीय खर्चामुळे मी पेमेंट करू शकलो नाही. नेहमीची कपात 2 मार्च रोजी होणार होती, पण अडचणींमुळे आणीबाणीमुळे मी पेमेंट करू शकलो नाही. 25 मार्चला मला बजाज फायनान्स कर्मचाऱ्यांचा फोन आला, त्यांनी पेमेंट उशिरा झाल्याबद्दल मला शिवीगाळ केली आणि धमकी दिली. 26 मार्चला रोजी मी स्वतः शिवाजीनगरमधील वाकडेवाडी येथील कंपनीच्या कार्यालयात गेलो आणि त्यांना अडचण सांगितली होती.”
दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणारे वानवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक रमेश साबळे म्हणाले, “आम्हाला पोलिस नियंत्रण कक्षाकडून घटनेची माहिती मिळाली होती. त्यानुसार आम्ही तात्काळ आमची टीम घटनास्थळी पाठवली. तपास केल्यानंतर, बाऊन्सर्सनी कबूल केलं की, ते बजाज फायनान्सचे व्यवस्थापक झिमान यांच्या सूचनेनुसार काम करत होते. दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलं आणि नंतर अटक करण्यात आली. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. बजाज फायनान्सचे व्यवस्थापक तसेच कंपनीसाठी रिकव्हरी एजंट म्हणून काम करणाऱ्या दोन बाऊन्सर्सविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


