पुणे प्रतिनिधी
संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील शेडगे दिंडी क्रमांक तीनचे प्रमुख जयसिंग महाराज विश्वनाथ मोरे इनामदार (वय-७५) यांचे बुधवारी
सकाळी नऊच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या मागे भाऊ, पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांचे ते थोरले बंधू होत.
गेल्या काही दिवसांपासून जयसिंग महाराज मोरे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. संत तुकाराम महाराज यांच्यासह वारकरी संप्रदायावर वादग्रस्त साहित्य प्रसिद्ध करणाऱ्यांना त्यांनी प्रखर विरोध केला होता. प्रसंगी त्यांनी न्यायालयीन लढाईही लढली.
संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील अनेक प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी त्यांनी कायम आग्रह धरला. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध संस्थानचे पदाधिकारी, अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


