
मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील दादर परिसरात दोन कारचा भीषण अपघात झाला असून, यात टॅक्सी चालकासह एका महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात शनिवारी (२९ मार्च) दुपारी १२ च्या सुमारास लोअर परळ येथील सेनापती बापट मार्गावरील एलफिन्स्टन पुलावर घडला.
प्राथमिक माहितीनुसार, एका भरधाव एसयूव्ही कारने समोरून येणाऱ्या टॅक्सीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की टॅक्सीचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातात टॅक्सीतील दोन जणांचा मृत्यू झाला.
एलफिन्स्टन पुलावर दुभाजक नसल्यामुळे वाहने एकमेकांच्या मार्गात येण्याचा धोका वाढतो. याशिवाय, या परिसरात मोठ्या प्रमाणावर कंपन्या असल्याने वाहनांची वर्दळही मोठी असते. लाखो कर्मचारी या पुलाचा वापर करतात. मात्र, अपघाताच्या वेळी शनिवार असल्याने नेहमीपेक्षा कमी वर्दळ होती आणि रस्ता मोकळा होता. त्यामुळे वेगाने आलेल्या कारने टॅक्सीला जोरदार धडक दिली.
या अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.