
मुंबई प्रतिनिधी
125 वर्षे जुना ब्रिटीशकालीन एलफिन्स्टन पूल १० एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने पुलाचे नविन काम सुरु करण्यास मंजुरी मिळवली आहे.
वाहतूक कोंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. शिवडी-वरळी कनेक्टर प्रकल्पाचा भाग म्हणून एमएमआरडीए हा एलफिन्स्टन पूल पाडून तेथे पुनर्बांधणी करणार आहे. सायन आओबी, कारनॅक ब्रिज, बेलासिस ब्रिज आणि रे रोड ब्रिजनंतर मुंबईतला बंद होणारा हा पाचवा ब्रिटीशकालीन पूल असेल.
एलफिन्स्टन पूल सुरक्षेच्या कारणास्तव पाडला जाणार आहे. त्याची पुनर्बांधणी देखील होणार आहे. मध्य-मुंबईतील हा ब्रिटीशकालीन पूल शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर प्रकल्पाचा भाग म्हणून डबल-टेकर पुलाने बदलला जाणार आहे. एमएमआरडीए पावसाळ्याच्या आधी हा पूल पाडणार आहे. एप्रिल २०२६ पर्यंत डबल डेकर पुलाच्या एका स्तराचे बांधकाम पूर्ण करण्याचा मानस असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
एल्फिटन पूल बंद केल्याने तेथील वाहतूक टिळक पूल (दादर) आणि करी रोड ब्रिजकडे वळवण्यात येणार आहे. या दोन्ही मार्गांवरुन अवजड वाहनांची वाहतूक सुरु असल्याने गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर पादचाऱ्यांसाठी परळ स्थानकाजवळ असलेला फूट ओव्हरब्रिज सार्वजनिक केला जाणार आहे. प्रभादेवी स्थानकाजवळ नवीन फूट ओव्हरब्रिज लवकर पूर्ण होणार असल्या़चे म्हटले जात आहे.
एमएमआरडीएने फेब्रुवारी २०२५ मध्ये एलफिन्स्टन पूल पाडण्याचे ठरवले होते. पण काही कारणांमुळे याला विलंब झाला. त्यानंतर मार्चमध्ये दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा असल्याने काम स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता एप्रिल महिन्यामध्ये एलफिन्स्टन पूल पाडण्याचे काम सुरु होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.