
वृत्तसंस्था
आठवड्याभराच्या मुक्कामासाठी अवकाशात गेलेल्या सुनिता विलियम्स आणि बुच विल्मोर यांच्या यानात बिघाड झाला आणि बोईंग स्टारलायनरची ही मोहिम तिथंच रखडली.
तब्बल 9 महिने या अंतराळवीरांना पृथ्वीपासून कैक मैल दूर राहावं लागलं आणि त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी शिकस्तीचे प्रयत्न नासानंही सुरू केले. एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीच्या मदतीनं, अमेरिकी सरकार आणि नासाच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश लाभलं असून, नासासाठी काम करणाऱ्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विलियम्स, त्यांचे सहकारी बुच विल्मोर आणि इतर दोन अंतराळवीर अखेर पृथ्वीवर यशस्वीरित्या परतले आहेत.
भारतीय प्रमाण वेळेनुसार बुधवारी पहाटे 3 वाजून 27 मिनिटांनी त्यांचं स्पेसक्राफ्ट यशस्वीरित्या फ्लोरिडातील समुद्रात लँड अर्थात स्प्लॅशडाऊन झालं आणि साऱ्या जगानंच सुटकेचा नि:श्वास सोडला. तब्बल 17 तासांच्या थरारक प्रवासानंतर विलियम्स पृथ्वीवर परतल्या आणि नासाच्या मुख्यालयासह इथं भारतातही एकच जल्लोष पाहायला मिळाला. तब्बल 286 दिवसांच्या या मुक्कामामध्ये विलियम्स यांनी ISS वर असताना पृथ्वीला 4576 वेळा फेरी मारली. हा संपूर्ण प्रवास 19 कोटी 50 लाख किमी अंतराचा असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होतं.