
भिवंडी प्रतिनिधी
महाराष्ट्रातील पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा गावात उभारण्यात आले आहे. शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर, 17 मार्च रोजी या मंदिराची प्राणप्रतिष्ठा आणि लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
हे मंदिर गड-किल्ल्याच्या शैलीत बांधण्यात आले असून, ऐतिहासिक किल्ल्यांप्रमाणे दिसावे यासाठी 1.5 एकर जागेत तटबंदी आणि भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे.
2018 मध्ये झाली होती बांधकामाला सुरुवात
या मंदिराचा भूमिपूजन सोहळा 4 मार्च 2018 रोजी पार पडला आणि मे 2018 मध्ये प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र, कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे काम रखडले, परंतु नंतर वेगाने काम पूर्ण करण्यात आले. ट्रस्टच्या माहितीनुसार, हे केवळ एक दर्शनस्थान नसून समाजातील सर्व स्तरांना प्रेरणा देणारे शक्तिपीठ ठरेल.
लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वैदिक आणि ब्राह्मण पद्धतीने पूजनासोबतच गोपूजन, होमहवन, 108 हवनकुंड, वास्तूपूजन आणि कलश पूजन विधी पार पडतील.
संध्याकाळी स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम, शिवचरित्र व्याख्यान, इतिहासकारांचे विचारसत्र आणि कीर्तन असे विविध कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहेत.
गुरुकुल शिक्षण आणि शस्त्र प्रशिक्षण केंद्राची सोय
मंदिर परिसरात गुरुकुल पद्धतीने शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच, शिवकालीन शस्त्र प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची योजना आखण्यात आली आहे. मंदिराचे गर्भगृह आणि सभामंडप एकूण 2500 चौरस फूट क्षेत्रफळामध्ये बांधण्यात आला असून संपूर्ण मंदिर 1.5 एकर जागेत उभारण्यात आले आहे.
शिवक्रांती प्रतिष्ठानच्या मते, हे मंदिर समाजासाठी प्रेरणास्थान ठरेल आणि वैदिक शिक्षण व युद्धकला प्रशिक्षणाचे केंद्र बनेल.
शिवाजी महाराजांची मूर्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू
मंदिराच्या भोवती तटबंदीखाली 36 चबुतरे बांधण्यात आले असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक प्रसंगांचे दृश्यचित्र कोरलेले आहेत. या चित्रांखाली मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत माहिती लिहिली जाणार आहे, जेणेकरून सर्व शिवभक्तांना ती समजण्यास मदत होईल.