
नाशिक प्रतिनिधी
खाजगी सावकारांचे पेव वाढत असतानाच नाशिकमधील सटाण्यामध्ये एका तरुणाच्या आत्महत्येच्या प्रकरणामध्ये तब्बल १२ खासगी सावकारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर पोलिसांनी आतापर्यंत ८ जणांना अटक केली आहे. सलून व्यवसायिक जनार्दन विजय महाले या २५ वर्षीय तरूणाने आत्महत्या केली होती.
आत्महत्येपूर्वी जनार्दन महाले याने खासगी सावकाराकडून घेतलेले पैसे वेळेवर परत होत नसल्याने त्यांच्याकडून वारंवार धमक्या येऊ लागल्याने आत्महत्या करत असल्याचे स्वत:च्या आवाजात रेकॉर्डींग करून ठेवली होती. या प्रकरणी पोलिसांनी मोबाईलची तपासणी केली. त्यानंतर हे धक्कादायक वास्तव समोर आलं आहं. त्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल करून अटक करण्यास सुरूवात केली आहे.
नाशिकच्या सटाणा तालुक्यात विना परवाना सावकारकीचा व्यवसाय करण्यासह युवकांच्या आत्महतेस कारणीभूत ठरलेल्या १२ हून अधिक खासगी सावकारांवर सटाणा पोलिसांनी गुन्हा दाखल करत ८ जणांना अटक केली आहे. या कारवाईमुळे बागलाण तालुक्यात खासगी सावकारकी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. १५ फेब्रुवारी रोजी सटाणा शहरातील मुख्य महामार्गावरील एका लॉजमध्ये दहाणे येथील सलून व्यवसायिक जनार्दन विजय महाले या २५ वर्षीय तरूणाने आत्महत्या केली होती.