
मुंबई प्रतिनिधी
मुबई महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी पालिका प्रशासनाने म्हाडाच्या धर्तीवर घरे विकण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या माहुल परिसरात 225 चौ. फुटांची 4 हजार 700 घरे बांधली असून त्यांची किंमत 12 लाख 60 हजार रुपये ठेवण्यात आली आहे.
लॉटरीच्या माध्यमातून ही घरे विकली जाणार असून या घरांसाठी महापालिका कर्मचाऱयांना सोमवारपासून अर्ज करता येणार आहेत.
माहुलमधील सदनिकांमध्ये प्रकल्पबाधित राहायला जात नसल्याने तब्बल 13 हजारांवर घरे रिक्त आहेत. या रिक्त सदनिकांची पालिकेला देखभाल करावी लागते. त्यामुळे या सदनिका आता महापालिकेच्या कर्मचाऱयांना मालकी तत्त्वावर विकण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. एमएमआरडीएने प्रकल्पबाधितांसाठी इमारती बांधून त्यातील सदनिकांचे हस्तांतरण महापालिकेला केले.
विविध विकास प्रकल्पांमध्ये घर बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना येथे राहण्यासाठी घरे उपलब्ध करून दिली जात आहेत. मुंबई महापालिका प्रशासन म्हाडाच्या धर्तीवर तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पहिल्यांदाच लॉटरी पद्धतीने स्वतःची घरे देणार आहे. महापालिका प्रशासनाने माहुल येथे बांधलेल्या इमारतीच्या संकुलात शाळेसह रुग्णालय व इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत.
अर्ज प्रक्रिया सोमवारपासून
मुंबईत घराचे स्वप्न अनेकांचे असले तरी त्याची किंमत आवाक्याबाहेर असल्याने परवडत नाही. पालिका कर्मचाऱ्यांसाठीची माहुलमधील घरे स्वमालकीने विक्री करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. चेंबूर-माहुल येथे मोक्याच्या ठिकाणी अवघ्या साडेबारा लाखांत घर मिळणार आहे. शिवाय ते कर्मचाऱयांना घर विकायचे असल्यास ते 5 वर्षांनंतर कधीही विकू शकतात. यासाठी सोमवारपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
म्हणून घरे विकण्याचा निर्णय
माहुल येथील ही जागा प्रदूषित असल्याने पुनर्वसनासाठी रहिवाशांनी तीव्र विरोध केला आहे. अनेकांना दमा, टीबीसारख्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या असून न्यायालयाच्या आदेशानंतर प्रकल्पबाधित इमारतींमध्ये पुनर्वसन न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पुनर्वसन झाल्यानंतरही सुमारे 13 हजारावर घरे रिक्त आहेत. या रिक्त सदनिकांची देखभाल पालिकेला करावी लागते. याचा खर्चही पालिकेला करावा लागतो आहे.