
मुंबई सेंट्रल बस स्थानकावरून पुन्हा एसटी बससेवा सुरू होणार आहे, त्यामुळे मागील अडीच महिन्यांपासूनचा प्रवाशांचा त्रास संपणार आहे. मुंबई विभागाच्या एसटी महामंडळ विभाग नियंत्रकांनी राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना सूचना दिल्या आहेत की, या फेऱ्या पूर्ववत करून गाड्या पुन्हा मुंबई सेंट्रलवरूनच सोडाव्यात.
वाहतूक पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा!
मागील अडीच महिन्यांपासून मुंबई सेंट्रल बस स्थानकातील काँक्रीटीकरणाचे काम सुरू होते. हे काम आता पूर्ण झाल्याने सोमवार, 17 मार्चपासून येथे पुन्हा एसटी वाहतूक सुरू होणार आहे. या काळात मुंबई सेंट्रलहून सुटणाऱ्या गाड्या कुर्ला नेहरूनगर, दादर, परळ आणि पनवेल स्थानकांमधून धावत होत्या.
का झाला होता बदल?
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) निधीतून मुंबई सेंट्रल एसटी आगाराच्या परिसरात काँक्रीटीकरणाचे काम करण्यात आले. 23 डिसेंबर 2024 रोजी हे काम सुरू झाले होते आणि 13 मार्च 2025 रोजी पूर्ण झाले. काँक्रीटीकरणामुळे मुंबई सेंट्रलमधून सुटणाऱ्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले होते. आता मात्र गाड्या पुन्हा मुंबई सेंट्रलवरूनच धावतील.