
मुंबई प्रतिनिधी
मालमत्ता कर थकविणा-या मोठ्या थकबाकीदारांविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेने जप्ती, लिलाव कारवाईचा धडाका सुरू केला आहे. या अंतर्गत महानगरपालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन खात्याने 2 बिल्डरांवर जप्ती आणि अटकावणीची कार्यवाही सुरु केली आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
यात दोन खासगी विकासकांच्या मालमत्तांचा समावेश आहे. भूखंड मालमत्ता करापोटी १ चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) प्रमाणे या दोन थकबाकीदार आस्थापनांकडे दंड रकमेसह एकूण 21 कोटी 63 लाख 56 हजार 867 रूपयांची थकबाकी आहे. थकबाकीदार आस्थापनांनी विहित २१ दिवसात करभरणा न केल्याने आता मालमत्ता जप्ती आणि अटकावणीची कार्यवाही करण्यात आली आहे.
महानगरपालिका प्रशासनाने सातत्याने आवाहन करुन आणि पाठपुरावा केल्यानंतरही मालमत्ता कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱया मालमत्ताधारकांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जप्ती आणि अटकावणीची कठोर कारवाई करण्यात येत आहे. या मालमत्तांमध्ये भूखंड आणि निवासी – व्यावसायिक इमारती,व्यावसायिक गाळे, औद्योगिक गाळे आदींचा समावेश आहे.
सर्व संबंधितांनी दिलेल्या मुदतीत करभरणा करावा आणि दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी,असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून वेळोवेळी केले जाते. त्यानंतरही, कर भरणा करण्यास टाळाटाळ करणा-यांवर कठोर कारवाई करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.