
मुंबई प्रतिनिधी
मुंबई नागपाडा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाण्याची टाकी साफ करताना गुदमरून ४ सफाई कामगारांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, बीएमसीचे वॉर्ड अधिकारी आणि रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाली.कामगार गुदमरल्याचे लक्षात येताच त्यांना तातडीने जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर ४ जणांना मृत घोषित केले.
सध्या मृत कामगारांची नावे आणि इतर तपशीलवार माहिती समोर आलेली नसली तरी या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
मुंबईच्या नागपाडा परिसरातील बिस्मिल्ला स्पेस या बांधकामाधीन इमारतीच्या तळघरात असलेल्या पाण्याच्या टाकीत गुदमरून ४ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एक कामगार गंभीर अवस्थेत आहे. हसीबुल शेख, राजा शेख, जलालू शेख आणि इमानदू शेख अशी मृत कामगारांची नावे आहेत, तर पुरहन शेख हा गंभीर जखमी आहे.
या कामगारांना पाण्याच्या टाकीत लावलेले खांब काढण्यासाठी आणि टाकी स्वच्छ करण्यासाठी उतरवण्यात आले. मात्र, ते एकामागोमाग एक आत गेले आणि परत बाहेर आलेच नाहीत. याची माहिती इतर कामगारांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना दिली. तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पाचही कामगारांना बाहेर काढून जेजे रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला.
कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी
या दुर्दैवी घटनेनंतर सर जेजे मार्ग पोलिसांनी तपास सुरू केला असून, पुढील कारवाई केली जात आहे. हे सर्व कामगार हातावर पोट असणारे मजूर असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी त्यांचे मित्र आणि सहकारी करत आहेत. मात्र, या घटनेला जबाबदार नेमका कोण आहे? कोणती सुरक्षा उपाययोजना करण्यात आली होती का? यासंबंधी चौकशी सुरू असून, लवकरच आवश्यक ती कारवाई केली जाईल, अशी माहिती जेजे मार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय काटे यांनी दिली आहे.