
पुणे प्रतिनिधी
अभिनेता अल्लू अर्जूनच्या प्रमुख भूमिकेतील पुष्पा सिनेमा तुफान गाजला. चंदनतस्करीशी संबंधित या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला. त्यामुळे, पुष्पा 2 सिनेमाची प्रतिक्षा सर्वांना होती.
नुकतेच काही महिन्यांपूर्वी पुष्पा 2 सिनेमा प्रदर्शित झाला होता. सिनेचाहत्यांनी त्यालाही भरभरुन दाद दिली. त्यामुळे, चंदनतस्कर पुष्पाची भुरळच चाहत्यांना पडल्याचे दिसून आले. दरम्यान, पुणे पोलिसांनी चंदनतस्करीचा ट्रक पकडला असून आता या तस्करीच्या मास्टरमाईंड वा म्होरक्यापर्यंत पोहोचण्यासाठी तपास सुरू आहे. कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूहून मुंबईच्या दिशेनं निघालेलं कंटेनर भरुन चंदन जप्त करण्यात आलं आहे. आता, या चंदनतस्कीरच्या सिंडीकेट मेंबर म्हणजेच पुष्पाचा शोध सुरु झाला. याप्रकरणी पुण्यातील पोलिसांनी सध्या चालकासह एकाला ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून प्राथमिक चौकशी करण्यात येत आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर पिंपरी चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
जेएनपीटीवरुन हे चंदन आंतरराष्ट्रीय बाजारात जाणार होतं, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तब्बल 10 ते 12 कोटी रुपयांचं हे चंदन असेल अशी प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी, पुण्यातील गुन्हे विभागाकडून चंदनाचं वजन केलं जातं आहे. त्यानंतरच हे चंदन किती आहे? आणि चंदनाची बाजारातील किंमत किती, व इतर बाबींचा उलगडा होईल. दरम्यान, पोलिसांकून उद्या पत्रकार परिषदेत या चंदनतस्कीरीची माहिती सार्वजनिक केली जाईल. तत्पूर्वी पोलिसांनी पकडलेलं चंदन आणि चंदन तस्करीचा ट्रक पाहून कुणालाही पुष्पा सिनेमाची आणि अल्लू अर्जुनची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान, हे चंदन लाल चंदन आहे की चंदनातील नेमका कुठला प्रकार आहे याबाबतही पोलिसांकडून तपास केला जात आहे. मात्र, चंदनाने भरलेला कंटनेर, लालबुंद लाकडं आणि आरोपीला पाहून पुष्पा सिनेमाचं चित्र डोळ्यासमोर उभं राहिल्याशिवाय राहत नाही.