
पुणे प्रतिनिधी
पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये तरुणीवर बलात्कार झाला. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडेला ताब्यात घेतले. या प्रकरणातील अपडेट समोर आली आहे.
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा तपास आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेद्वारे केला जाणार आहे. संध्याकाळी पुणे गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा वर्ग होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
स्वारगेट बस डेपोमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणाचा तपास स्वारगेट पोलीस करत होते. आता या प्रकरणाचा तपास पुणे गुन्हे शाखा करणार आहे. यासंबंधित आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहे. त्यांच्या आदेशानुसार, स्वारगेट पोलिसांकडून या प्रकरणाची जबाबदारी गुन्हे शाखेकडे सुपूर्त केली जाणार आहे.
दरम्यान बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याची डीएनए चाचणी पूर्ण झाली आहे. या चाचणीचा अहवाल लवकरच पोलिसांना मिळणार आहे. याशिवाय ज्या रिकाम्या बसमध्ये बलात्काराची घटना घडली, तेथील तपासणी फॉरेन्सीक पथकाकडून करण्यात आली आहे. बसमध्ये दत्ता गाडेच्या केसांसह अनेक गोष्टी सापडल्या आहेत. या गोष्टींची आणि दत्ता गाडेच्या डीएनएची पडताळणी होणार आहे.
दत्ता गाडेच्या वकिलाने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी पुरावे सादर करताच तो दावा फोल ठरला. आता आरोपीच्या वकिलाने यू-टर्न घेतल्याचे समोर आले आहे. वकिलाने आर्थिक व्यवहार झाल्याचे आम्ही बोललो नाही असे पत्रकार परिषदेमध्ये म्हटले. याशिवाय त्यांनी आम्हाला पोलीस संरक्षण द्यावे असेही त्यांनी म्हटलं आहे.