
कल्याण प्रतिनिधी
कल्याणमधील काटेनमोली परिसरात काल रात्री एका व्यक्तीचा गोळी घालून, डोक्यात सपासप वार करून निर्घृणपणे खून करण्यात आला. नाना पावशे चौकात ही घटना घडली. रंजीत दुबे असं खून झालेल्याचं नाव आहे.
रंजीत दुबे याची त्याचा चुलत भाऊ राम सागर यानेच ही हत्या केल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. रंजीत दुबे आणि रामसागर यांच्या कुटुंबात गावच्या जमिनीवरुन वाद होता. याच वादातून राम सागर यांनी आपल्या चुलत भावाला निर्घृणपणे संपवल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर कोळशेवाडी पोलिसांनी राम सागर याच्यावर गुन्हा दाखल केला होता. अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी राम सागर याला बेड्याही ठोकल्या. मात्र, जेव्हा भावानेच भावावर वार केले होते, तेव्हा गंभीर जखमी झालेला रंजीत दुबे हा मदतीसाठी आणि जीव वाचवण्यासाठी मदतीची याचना करत होता, मात्र, कोणीही त्याच्या मदतीला आलं नाही.
रंजित दुबेला त्याचाच सख्ख्या चुलत भाऊ राम सागर दुबेने भर रस्त्यात गोळ्या घातल्या. दोन गोळ्या राम सागर दुबेने रंजीतवरती झाडल्या, त्यातली एक गोळी लागल्यानंतर भेदरलेला रंजित आपला स्वतःला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडत होता. रस्त्याने पळत होता, बाजूला असलेल्या इमारतीमध्ये रंजित आपला जीव वाचवण्यासाठी गेला, त्याच्या शरीरावरून रक्ताच्या धारा लागल्या होत्या, त्या इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत तो पोहोचला. त्या इमारतीमधील घरांचा दरवाजा, बेल वाजवून त्याने मदतीची हाक मारत होता. मात्र, रंजीतला मदतीसाठी कोणीही दरवाजा उघडला नाही. मारेकरी राम सागर आणि त्याचे साथीदार त्याचा पाठलाग करत इमारतीमध्ये शिरले आणि चौथ्या मजल्यावर डोक्यात वार करत त्याचा जीव घेतला. ज्या इमारतीमध्ये रंजित दुबे जीव वाचवण्यासाठी धावला त्या ठिकाणी त्याचे रक्त पडल्याचे दिसून येत होते. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. तर लोक अशा कठीण प्रसंगात मदतीसाठी पुढे येत नसल्याने संताप देखील व्यक्त केला जात आहे.