
नवी मुंबई प्रतिनिधी
राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून अनेक ठिकाणची समीकरणं बदलायला सुरुवात झाली आहे. शिंदेंच्या शिवसेनेत जाणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. तसेच भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे.
सध्या नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण राष्ट्रवादीमध्ये गेलेले नगरसेवक परत भाजपमध्ये आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 30 माजी नगरसेवकांची घरवापसी झाली आहे. त्यामुळे शरद पवार गटासाठी ही धक्कादायक बाब आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. विधानसभा निवडणुकीच्या वेळी संदीप नाईक राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात गेले होते. त्यावेळी काही नगरसेवकदेखील त्यांच्यासोबत गेले होते. आता या नगरसेवकांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे.