
ठाणे प्रतिनिधी
गेल्या आठवड्यापासून अनधिकृत बिल्डिंगवर तोडकर कारवाई सुरू असताना कल्याण डोंबिवली महापालिका परिसरातील बोगस महारेरा प्रकरणातील साडेसहा हजार रहिवाशी बेघर होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने 48 इमारतींमधील रहिवाशांना पुढच्या दहा दिवसात घरे खाली करण्याची नोटीसा धाडली आहे.
मनपा आणि पोलिसांकडून घरे खाली करण्यासाठी धमकावले जात असल्याचा आरोप यावेळी रहिवाशांनी केला.
बिल्डरने फसवणूक केली, आमची काय चूक?
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील खोटे दस्तऐवज सादर करत रेरामध्ये नोंदणी केल्याने 65 इमारती कारवाईच्या रडारवर आल्या आहेत. आता या बेकायदा ठरवण्यात आलेल्या इमारतींमधील साडेसहा हजार रहिवाशी बेघर होणार असल्यामुळे रहिवाशी हवालदिल झाले आहेत. बँकेने कर्ज दिले, पै पै जमा करून घर घेतले. आता चार वर्षांनी घर तोडण्याच्या नोटिसा धाडल्या. यात आमची चूक काय आहे असा सवाल या रहिवाशांनी केला आहे.
आधी आमच्यावर बुलडोझर चालवा
इमारतींवर बुलडोझर चालवण्याआधी आमच्यावर बुलडोझर चालवा. आम्ही घरे खाली करणार नाही असा पवित्रा आता रहिवाशांनी घेतला आहे. तसेच हे सर्व रहिवासी ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांच्या सोबत चर्चा करत आहेत. उद्धव ठाकरेंनी यामध्ये लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
संपूर्ण प्रकरणाबाबत ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे या पीडित रहिवाशांच्या बाजूने ठामपणे उभे असल्याचा दावा केला. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांसह पालिका आयुक्तांना भेटून या संपूर्ण प्रकरणात तोडगा काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
न्यायालयाने याचिका फेटाळली
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 65 इमारती तोडायच्या होत्या. महापालिकेने यापैकी काही इमारती तोडल्या आहेत. तर अजून 48 इमारती तोडणे बाकी आहे. या 48 इमारती तीन महिन्याच्या आत तोडायच्या होत्या. मात्र काही इमारतधारक कोर्टात गेल्याने इमारती तोडता आल्या नाहीत. मात्र आता कोर्टाने त्यांची याचिका फेटाळल्याने या 48 इमारतींवर हातोडा पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्या इमारती पाडायच्या आहेत. नागरिक कोर्टात गेले होते. मात्र त्यांची याचिका फेटाळली आहे त्यामुळे इमारती रिक्त करून त्यांच्यावर कारवाई करावी लागणार आहे. इमारती पोलिसांच्या मदतीने खाली करण्याच्या हालचाली सुरू आहेत. रेराला मनपाच्या खोट्या साक्षऱ्या करून रजिस्टर केले आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.