चंद्रपूर प्रतिनिधी
चंद्रपूर : शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांना घुग्घुस पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली आहे. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसांपूर्वी झालेल्या ‘त्रिशूल आंदोलना’शी संबंधित प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दिवाळीच्या सणातच पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
वेकोली (WCL) प्रशासनाविरोधात स्थानिक बेरोजगार, शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाच्या तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी मुकेश जिवतोडे यांना आवाजाचे नमुने देण्यासाठी उपस्थित राहण्याची सूचना केली होती. मात्र, दिवाळीचा सण असल्याने आणि आपण मुंबईत असल्यामुळे दिवाळीनंतर पोलिसांसमोर हजर राहण्याची मुभा द्यावी, अशी विनंती केल्याचे जिवतोडे यांनी सांगितले.
असे असतानाही दिवाळीच्या दिवशीच पोलिसांनी त्यांच्या घरी पोहोचून कारवाई केली. त्यामुळे जिवतोडे यांनी या कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सणासुदीच्या काळात घरात लहान मुले आणि नातेवाईक उपस्थित असताना पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे कुटुंबीयांवर मानसिक ताण निर्माण झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
‘प्रशासनाकडून सत्तेचा गैरवापर’
पोलिसांच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना मुकेश जिवतोडे यांनी प्रशासनावर राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप केला. “आम्ही सत्तेत असलो तरी प्रशासनाकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे,” असे म्हणत त्यांनी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
‘जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन केले’
आपल्याविरोधात खंडणी किंवा मारहाणीचा कोणताही गुन्हा दाखल नसल्याचा दावा जिवतोडे यांनी केला आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा, बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात आणि स्थानिकांच्या प्रश्नांना न्याय मिळावा, यासाठी आपण आंदोलनात सहभागी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, यापूर्वी पाठवण्यात आलेल्या नोटिशीमध्ये महिलांशी संबंधित गुन्हे तसेच अवैध दारूविक्रीच्या प्रकरणांचा उल्लेख करण्यात आला होता. या माध्यमातून आपल्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही जिवतोडे यांनी केला. मात्र, संबंधित प्रकरणांशी आपला कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दिवाळीच्या दिवशी झालेली ही अटक, त्यामागील त्रिशूल आंदोलनाचे प्रकरण आणि पोलिसांच्या भूमिकेवर जिवतोडे यांनी केलेले आरोप यामुळे चंद्रपूरमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.


