चंद्रपूर : प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यासह देशभरात उत्साहाचे वातावरण असताना चंद्रपूर शहरात मात्र या उत्सवाला हिंसाचाराचे गालबोट लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. गांधी चौक परिसरात आयोजित मिरवणुकीदरम्यान डीजेसमोर नाचताना झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली.
इंदिरानगर येथील ‘भीम रत्न बहुउद्देशीय अनुयायी मंडळा’तर्फे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मध्यरात्रीच्या सुमारास डीजेसमोर मोठ्या उत्साहात नृत्य सुरू असताना झालेल्या धक्काबुक्कीवरून रविकांत टेंभूरकर (वय ३६) यांचा काही युवकांशी वाद झाला. सुरुवातीला किरकोळ भांडण वाटणारा हा वाद काही क्षणांतच गंभीर स्वरूप धारण करून हिंसाचारात परिवर्तित झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, संतप्त झालेल्या पाच जणांनी एकत्र येत रविकांत यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मिरवणुकीत एकच गोंधळ उडाला आणि काही वेळातच परिसरात रक्ताचा सडा पडला. गंभीर जखमी अवस्थेत रविकांत यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर चंद्रपूर शहरात मोठी खळबळ उडाली असून, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिरवणुकीत काही युवक शस्त्रांसह फिरत असल्याचेही समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, हल्ल्यात सहभागी असलेल्या संशयितांचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.


