प्रमोद सावंत
वांगणी (सिंधुदुर्ग) : गोवा आणि कोकणाला पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकशी जोडणाऱ्या महत्त्वाच्या आंबोली घाटात आज पहाटेच्या सुमारास महाकाय झाड रस्त्याच्या मधोमध कोसळल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. या घटनेमुळे गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोल्हापूर व बेळगावकडे जाणारी तसेच कोकणाच्या दिशेने येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. घाटात दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
सावंतवाडीहून आंबोलीच्या दिशेने जाताना दाणोलीपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. पहाटेच्या सुमारास अचानक एक मोठे झाड उन्मळून थेट रस्त्यावर आडवे पडले. त्यामुळे दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनांचा मार्ग बंद झाला. मात्र, झाड कोसळले त्या वेळी त्याखाली कोणतेही वाहन नसल्याने सुदैवाने जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही.
दरम्यान, आंबोली घाटातील हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अखत्यारीत येत असून, अशा संवेदनशील घाटमार्गांवर आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक कर्मचारी आणि बचाव साहित्य २४ तास उपलब्ध असणे अपेक्षित आहे. विशेषतः पावसाळ्यात आणि संवेदनशील ऋतूंमध्ये अशा घटनांचा धोका लक्षात घेता यंत्रणा सज्ज असणे गरजेचे आहे.
मात्र, झाड कोसळल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कर्मचारी वेळेत घटनास्थळी उपलब्ध न झाल्याने अडकून पडलेल्या स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालकांनीच पुढाकार घेतला. नागरिकांनी कुऱ्हाडी आणि अन्य उपकरणांच्या मदतीने झाडाच्या फांद्या तोडून रस्ता मोकळा करण्याचे काम हाती घेतले आहे.
झाड हटविण्यासाठी स्थानिकांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, रस्त्याचा किमान एक मार्ग मोकळा करून वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. महामार्ग विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे स्थानिकांनाच रस्ता मोकळा करण्याची जबाबदारी घ्यावी लागल्याचे या घटनेतून समोर आले आहे.


