सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्याच्या सहकार आणि राजकारणातील अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक आज निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. संचालक मंडळाच्या २१ जागांपैकी ९ जागा बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित १२ जागांसाठी आज, रविवार (१ नोव्हेंबर) रोजी मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत राज्यातील दोन मंत्र्यांसह अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, कोण बाजी मारणार, याची उत्सुकता संपूर्ण जिल्ह्याला लागली आहे.
विशेषतः ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे विरुद्ध त्यांचे बंधू शेखर गोरे, पालकमंत्री शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजितसिंह पाटणकर आणि फलटणमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर विरुद्ध समशेरसिंह नाईक निंबाळकर या प्रतिष्ठेच्या लढतींकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
११ मतदान केंद्रांवर २ हजार २१ मतदार
जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये ११ मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीसाठी एकूण २ हजार २१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने ११५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, मतदान केंद्रांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उर्वरित १२ जागांसाठी २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
माणमध्ये गोरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला
माण तालुक्यातील सोसायटी मतदारसंघाची निवडणूक सर्वाधिक चर्चेत आहे. राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर त्यांचेच बंधू शेखर गोरे यांचे आव्हान आहे. या लढतीत मनोजकुमार पोळ हेदेखील रिंगणात असल्याने तिरंगी सामना रंगला आहे. एकाच कुटुंबातील दोन राजकीय नेते आमनेसामने आल्याने या निकालाची उत्सुकता वाढली आहे. जयकुमार गोरे यांच्यासाठी ही निवडणूक राजकीय वर्चस्वाची, तर शेखर गोरे यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई मानली जात आहे.
पाटणमध्ये देसाई-पाटणकर संघर्ष
पाटण तालुक्यात पालकमंत्री शंभूराज देसाई आणि सत्यजितसिंह पाटणकर यांच्यात थेट सामना होत आहे. या लढतीत दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. पाटणमधील राजकीय समीकरणे आणि स्थानिक कार्यकर्त्यांची ताकद कोणाच्या बाजूने उभी राहते, यावर निकालाचे गणित अवलंबून राहणार आहे. मंत्रिपदाची ताकद विरुद्ध स्थानिक राजकीय प्रभाव, असा या लढतीचा रंग आहे.
फलटणमध्ये राजे-दादा गटाची प्रतिष्ठेची लढाई
फलटण तालुक्यात संजीवराजे नाईक निंबाळकर आणि समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यात चुरशीची लढत होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची फलटणमधील मतदान केंद्रावर भेट झाल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली. दोन्ही गटांतील राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
नऊ जागा बिनविरोध; आता १२ जागांचा फैसला
जिल्हा बँकेच्या २१ संचालकपदांपैकी ९ जागांवर यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी झालेल्या राजकीय घडामोडींमुळे अनेक दिग्गजांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यामुळे उर्वरित १२ जागांसाठीच प्रत्यक्ष मतदान होत आहे. महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागावाटप आणि स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे जुळवण्याचे प्रयत्न झाले; मात्र काही मतदारसंघांमध्ये संघर्ष अटळ ठरला.
३ नोव्हेंबरला निकाल; कोणाच्या हाती बँकेची सत्ता?
आजच्या मतदानानंतर मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. जिल्हा बँकेवरील वर्चस्व हे केवळ सहकार क्षेत्रापुरते मर्यादित नसून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीही महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे जयकुमार गोरे आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांची प्रतिष्ठा, फलटणमधील राजकीय समीकरणे आणि इतर मतदारसंघांतील उमेदवारांची ताकद यांचा कस आज लागणार आहे.
एकूणच, सातारा जिल्हा बँकेची निवडणूक म्हणजे सहकाराच्या सत्तेचा फैसला आणि जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाची लढाई ठरत आहे. मतपेटीतून कोणाचे राजकीय वजन वाढणार आणि कोणाला धक्का बसणार, याचे उत्तर ३ नोव्हेंबरला मिळणार आहे.


