रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी : कोकणचा जगप्रसिद्ध हापूस आंबा म्हटले की आंबाप्रेमींच्या तोंडाला पाणी सुटते. साधारणपणे मार्च-एप्रिल महिन्यात सुरू होणाऱ्या हापूसच्या नियमित हंगामाला अद्याप बराच अवकाश असतानाच यंदा ऑक्टोबर महिन्यातच कोकणच्या हापूसने बाजारपेठेत दमदार हजेरी लावली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांतील बागायतदारांनी प्रतिकूल हवामानावर मात करत आंब्याचे उत्पादन घेतले असून, हंगामापूर्वीच हापूसच्या पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे रत्नागिरीच्या पहिल्याच चार डझनांच्या पेटीला तब्बल २१ हजार रुपये, तर एका डझनाला सहा हजार रुपये असा विक्रमी स्वरूपाचा दर मिळाला आहे. त्यामुळे आंबा व्यावसायिकांसह ग्राहकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील गावखडी येथील वडिलोपार्जित आंबा बागायतदार दत्ताराम पड्यार यांच्या बागेतील हापूस आंब्याची पहिली चार डझनांची पेटी रत्नागिरी शहरातील बाजारपेठेत दाखल झाली. गोखले नाका येथील सुमारे ५५ वर्षांची परंपरा असलेल्या पोवार बंधू आंबेवाले यांच्याकडे ही पेटी विक्रीसाठी आली. ऑक्टोबर महिन्यातच हापूसची पेटी बाजारात दाखल होण्याची ही घटना आंबा व्यवसायाच्या दृष्टीने विशेष मानली जात आहे. या पहिल्या पेटीला २१ हजार रुपये मिळाल्याने यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीलाच हापूसने आपल्या दराची चुणूक दाखवून दिली आहे.
सिंधुदुर्गचा हापूसही वाशी मार्केटमध्ये
रत्नागिरीपाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूसनेही बाजारपेठेत प्रवेश केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गिरये रामेश्वर येथील प्रगतशील आंबा बागायतदार नीलेश बानकर यांनी ऑक्टोबर महिन्यातील संकष्टीच्या मुहूर्तावर हापूस आंब्याची पहिली पेटी मुंबईच्या वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे रवाना केली आहे. दिवाळीच्या कालावधीत आणखी सहा ते सात पेट्या बाजारात पाठवण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. त्यामुळे यंदा नियमित हंगाम सुरू होण्यापूर्वीच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या हापूसची चव बाजारपेठेत चाखायला मिळणार आहे.
मोहर वाचवण्यासाठी बागायतदारांची कसरत
यंदा एप्रिल ते जूनदरम्यान आंब्याच्या झाडांना मोहर आला होता. मात्र, बदलते हवामान आणि प्रतिकूल निसर्गचक्रामुळे हा मोहर टिकवून ठेवणे बागायतदारांसाठी मोठे आव्हान ठरले. मोहराचे संरक्षण करण्यासाठी झाडांवर छप्पर उभारणे, वेळोवेळी औषध फवारणी करणे आणि बागेची विशेष निगा राखणे अशा अनेक उपाययोजना कराव्या लागल्या. निसर्गाच्या लहरीपणाशी सामना करत बागायतदारांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच ऑक्टोबर महिन्यात हापूसचे उत्पादन बाजारात आणणे शक्य झाले.
गेल्या वर्षी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आपण हापूस आंब्याची पहिली पेटी बाजारात पाठवली होती. यंदाही हंगामातील पहिली पेटी बाजारात पाठवण्याचा मान मिळाल्याचे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया बागायतदार नीलेश बानकर यांनी दिली.
दिवाळीत हापूसच्या पेट्यांची आवक वाढणार?
साधारणपणे उन्हाळ्यात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणारा कोकणचा हापूस यंदा ऑक्टोबरमध्येच दाखल झाल्याने आंबा हंगामाच्या सुरुवातीचे चित्र बदलले आहे. प्रतिकूल हवामान, बदलते निसर्गचक्र आणि उत्पादनातील अडचणी यांवर मात करून बागायतदारांनी साधलेले हे यश महत्त्वाचे ठरत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर आणखी काही पेट्या बाजारात दाखल होणार असल्याने हापूसच्या आवकेकडे व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, हा सुरुवातीचा मर्यादित हंगाम असून नियमित उत्पादन आणि बाजारातील दरांचे चित्र पुढील काही महिन्यांत स्पष्ट होणार आहे. ऑक्टोबरमध्येच कोकणच्या हापूसने बाजारपेठेत दिलेली ही हजेरी आंबाप्रेमींसाठी मात्र सुखद पर्वणी ठरली आहे.


