मुंबई प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईतील संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. झिशान सिद्दिकी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पार्थ पवार यांच्या पुढाकारातून झालेल्या या नियुक्तीमुळे मुंबईतील पक्षसंघटनेत झिशान सिद्दिकी यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत ही नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या हस्ते आज मुंबई येथील देवगिरी निवासस्थानी आमदार श्री. झिशान सिद्दिकी यांची मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.… pic.twitter.com/oaFFevPrlC
— Parth Sunetra Ajit Pawar (@parthajitpawar) October 28, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर झिशान सिद्दिकी यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना ४६ हजार ३४३ मते मिळाली; मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार वरुण सरदेसाई यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर झिशान सिद्दिकी यांना विधानपरिषदेवर संधी मिळाली. आता मुंबई विभागीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याने पक्षाच्या मुंबईतील संघटनात्मक कामकाजात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
मुंबईतील संघटनबांधणीचे आव्हान
मुंबईच्या राजकारणात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून संघटनात्मक ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत झिशान सिद्दिकी यांच्यासमोर पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, कार्यकर्त्यांना एकत्र आणणे आणि मुंबईतील राजकीय आव्हानांना सामोरे जाणे, अशी आव्हाने असतील.
पार्थ पवार यांच्या पुढाकारातून मिळालेली ही जबाबदारी झिशान सिद्दिकी यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद कितपत वाढते आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीती कशी आकार घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


