मुंबई प्रतिनिधी
मुंबई : नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्याचे उकाई धरणातील पाच टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाच्या उच्चस्तरीय पुनर्विचार समितीच्या बैठकीत महाराष्ट्राची बाजू मांडत या पाण्याची मागणी केली.
नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राला एकूण दहा टीएमसी पाणी मंजूर आहे. यापैकी पाच टीएमसी पाणी वळण कालव्याद्वारे, तर उर्वरित पाच टीएमसी पाणी गुजरातमधील उकाई धरणातून देण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, उकाई धरणातील महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी मिळण्यासाठी आवश्यक मान्यता देण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत यापूर्वी झालेल्या बैठकीत नियमानुसार महाराष्ट्राला पाणी देण्याचा निर्णय झाला होता. त्याच अनुषंगाने उकाई धरणातून महाराष्ट्राला पाणी मिळणे अपेक्षित असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीला केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहनलाल यादव आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा उपस्थित होते. महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी उपलब्ध करून देण्याबाबत फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेला प्रतिसाद देत सी. आर. पाटील यांनी पाणी देण्याचे निर्देश दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा आणि जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले उपस्थित होते.


