मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने सोमवारी लोकल वाहतूक विस्कळीत झाली. गाड्या उशिराने धावत असल्याने स्थानकांवर मोठी गर्दी झाली. लोकलमधील प्रवाशांना वेळेवर माहिती मिळत नसल्याने अनेकांची गैरसोय झाली. या गोंधळात रेल्वे रुळांवरून चालताना तीन जणांचा मृत्यू झाला.
भांडुप स्थानकाजवळ एसी लोकलच्या धडकेत साहिल थिटे (२१) या तरुणाचा मृत्यू झाला. तर विक्रोळी आणि घाटकोपर स्थानकांदरम्यान राहुल राजभर (२५) आणि खरबान राजभर (४०) यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. याबाबत अधिक माहिती मिळण्याची प्रतीक्षा असल्याचे रेल्वे पोलिस उपायुक्त प्रज्ञा झेडगे यांनी सांगितले.
साहिल हा मुलुंड कॉलनीतील अमर नगर परिसरात राहत होता. तो बीकॉमच्या अंतिम वर्षात शिकत होता. ठाणे येथे कॉम्प्युटर क्लास करून तो घरी जाण्यासाठी भांडुप स्थानकात आला होता. तो फलाट क्रमांक चारवर उभा असताना फलाट क्रमांक दोनवर लोकल येत असल्याची घोषणा झाली. त्यामुळे तो रुळांवरून दुसऱ्या बाजूला जात असताना एसी लोकलची त्याला धडक बसली. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. साहिलला दोन बहिणी आहेत.
उद्घोषणांमुळे प्रवाशांचा गोंधळ
मुलुंड ते विक्रोळी दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे लोकल उशिराने धावत असल्याच्या घोषणा केल्या जात होत्या. मात्र, लोकलमध्ये प्रवास करताना गाडी कुठे थांबणार आणि पुढे काय होणार, याची स्पष्ट माहिती प्रवाशांना मिळत नव्हती. त्यामुळे काही प्रवासी लोकलमधून उतरून रुळांवरून चालू लागले. मात्र, त्याच मार्गावरून इतर लोकल आणि एक्स्प्रेस धावत असल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला.
नाहूर स्थानकात दुपारी दोन वाजता आलेल्या प्रवाशांना इंडिकेटरवर दुपारी १२.३७ वाजताच्या लोकलची माहिती दिसत होती. प्रत्यक्षात ही लोकल दुपारी २.३५ वाजता आली. नाहूर ते कांजूरमार्ग हे अंतर पार करण्यासाठी एका लोकलला सव्वा तास लागला.
प्रवासासाठी तीन तासांहून अधिक वेळ
ठाकुर्ली ते सीएसएमटी हा प्रवास सामान्यतः सव्वा ते दीड तासांत पूर्ण होतो. मात्र, सोमवारी या प्रवासाला तब्बल तीन तास लागले. दुपारी २.१३ वाजताची सीएसएमटीकडे जाणारी लोकल सायंकाळी ५.१० वाजता पोहोचली. डोंबिवलीहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद लोकलमधील प्रवाशांनाही साडेतीन तासांचा फटका बसला.
भांडुपनंतर लोकलचा वेग काहीसा वाढला; मात्र मशीद स्थानकात पुन्हा वाहतूक रखडली. एक लोकल जवळपास ४० मिनिटे एकाच ठिकाणी उभी होती. या सर्व प्रकारामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. रेल्वेच्या गोंधळात साहिलचा मृत्यू झाल्याने थिटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.


