मुंबई प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) सुमारे ८३ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी आनंददायी ठरण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी तातडीने कार्यवाही करा, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांना दरमहा साधारणपणे ७ ते १० तारखेदरम्यान वेतन दिले जाते. मात्र, यंदा ६ नोव्हेंबरपासून दिवाळी सणाला सुरुवात होत असल्याने कर्मचाऱ्यांना सणाच्या खरेदीसह घरगुती खर्चाचे नियोजन वेळेत करता यावे, यासाठी वेतन आधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वेतनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्यावर भर
दिवाळीपूर्वी वेतन अदा करण्यासाठी एसटी महामंडळाच्या अर्थ व नियोजन विभागाने राज्य शासनाकडे तातडीने पाठपुरावा करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आवश्यक असलेले अनुदान तसेच प्रवासी सवलतींपोटी शासनाकडून मागील महिन्यांतील प्रलंबित रक्कम वेळेत मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देशही सरनाईक यांनी दिले आहेत.
एसटी महामंडळाच्या आर्थिक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांच्या सणाच्या आनंदावर परिणाम होऊ नये, याला प्रशासनाने प्राधान्य द्यावे, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. शासनाशी समन्वय साधून दिवाळीपूर्वी प्रत्येक कर्मचाऱ्याच्या खात्यात वेतन जमा होईल, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.


