मुंबई प्रतिनिधी
भाईंदर : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील चेना गाव परिसरात रानडुकरांची शिकार करण्यासाठी गेलेल्या टोळक्यात गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत विजय सुखरू सापटे (६०) यांचा गोळी लागून मृत्यू झाला, तर कुणाल शेलार आणि कल्पेश ढगळा हे दोघे जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, मृत्यूची माहिती पोलिसांना न देता आणि शवविच्छेदन न करताच पहाटे अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मृत्यूचे कारण नमूद करणारे प्रमाणपत्र देणाऱ्या खासगी डॉक्टरसह चार ते पाच जणांना काशीगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाच ते सहा जणांचा एक गट रानडुकरांची शिकार करण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गेला होता. त्यांच्याकडे बंदुका, छरे आणि शिकारीसाठी लागणारे साहित्य होते. मध्यरात्री १२ ते १ वाजण्याच्या सुमारास बॅटरीच्या प्रकाशात जंगलात शिकार सुरू असताना अंधारात प्राण्याचे डोळे समजून एका दिशेने गोळीबार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या गोळीबारात बेलखडी पाडा, चेना गाव येथील रहिवासी विजय सापटे यांच्या छातीत गोळी लागली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते मिरा-भाईंदर महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत होते. या घटनेत कुणाल शेलार यांच्या मांडीला, तर कल्पेश ढगळा यांच्या खांद्याला गोळी लागल्याची माहिती आहे. दोघांवर काशीगाव येथील आशिष रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत व्यक्तीसोबत त्यांचा अल्पवयीन मुलगाही असल्याची माहिती समोर आली असून, त्याबाबत तपास सुरू आहे.
घटनेची माहिती एका समाजसेवकाने प्रशासनाला दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सुरुवातीला जखमींनी मासेमारी करताना पाण्यात स्फोटकाचा स्फोट झाल्याने शरीरात छरे घुसल्याचे सांगितल्याची माहिती आहे. नदीच्या पाण्यात स्फोटक टाकून मासेमारी करताना दुखापत झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी चौकशी केली असता शिकारीदरम्यान गोळीबार झाल्याची बाब समोर आल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता तेथे रक्ताचे डाग आढळल्याची माहिती आहे. सुरुवातीला दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष घटनेतील विसंगती लक्षात घेऊन पोलिसांनी संबंधितांची चौकशी सुरू केली आहे.
या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे, विजय सापटे यांच्या मृत्यूची माहिती पोलिसांना न देता आणि शवविच्छेदन न करताच पहाटे अंत्यसंस्कार उरकण्यात आल्याचा आरोप आहे. सापटे यांचा मृत्यू घरी हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे नमूद करणारे प्रमाणपत्र एका खासगी डॉक्टरने दिल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यूचे कारण आणि परिस्थिती याबाबत प्रमाणपत्रात चुकीची माहिती दिली गेली का, याचा तपास पोलीस करीत आहेत. मृत्यूची माहिती का लपविण्यात आली आणि अंत्यसंस्कार घाईने का करण्यात आले, याचीही चौकशी सुरू आहे.
संरक्षित आणि पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बेकायदा प्रवेश करून शस्त्रांच्या साहाय्याने शिकार केल्याचा प्रकार समोर आल्याने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणात सदोष मनुष्यवध, मृतदेहाची विल्हेवाट लावणे आणि पुरावे लपविण्याच्या संशयासंदर्भात कायदेशीर कारवाईचा तपास सुरू आहे. याशिवाय, उद्यान प्रशासनाकडून वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मिरा-भाईंदर गुन्हे प्रकटीकरण शाखा-१ आणि काशीगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. ताब्यात घेतलेल्या संशयितांची चौकशी सुरू असून, या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.


