मुंबई प्रतिनिधी
मुंबई : जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर गुरुवारी रात्री काही मिनिटांच्या अंतराने झालेल्या दोन अपघातांत दोघांचा बळी गेला. संदेश सुरेश कालेकर (३६) आणि सुमन यंगटा शिरकुल यांचा या दुर्घटनांमध्ये मृत्यू झाला. एकाच मार्गावर घडलेल्या या दोन घटनांमुळे जेव्हीएलआरवरील वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जोगेश्वरी पूर्वेतील मजास गाव टेकडी परिसरात राहणारे संदेश कालेकर पत्नीला भेटण्यासाठी दुचाकीवरून घाटकोपरला गेले होते. रात्री परतताना शामनगर तलावाजवळ मेट्रो स्थानकाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी त्यांच्या दुचाकीचे चाक घसरले आणि ते रस्त्यावर पडले. त्याच वेळी मागून वेगाने आलेल्या डंपरचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी फरार डंपरचालकाचा शोध घेऊन त्याला अटक केली.
या घटनेनंतर काही मिनिटांतच जेव्हीएलआरच्या मुख्य मार्गावर पुलाखाली दुसरा अपघात झाला. रस्ता ओलांडणाऱ्या सुमन यंगटा शिरकुल या भरधाव मोठ्या वाहनाच्या चाकाखाली आल्या. या दुर्घटनेत त्यांचाही जागीच मृत्यू झाला. एकाच रात्री दोन जणांचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जेव्हीएलआर मार्गावरील अपघातांची मालिका आणि रस्त्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.


