ठाणे प्रतिनिधी
ठाणे : ठाण्यातील वर्दळीच्या कोपरी पुलाजवळ उन्नत मार्गाच्या बांधकामादरम्यान लोखंडी सळ्यांचा मोठा सांगाडा चालत्या कारवर कोसळल्याची घटना १७ ऑक्टोबर रोजी घडली. या दुर्घटनेत कारचे मोठे नुकसान झाले. मात्र, कोणालाही दुखापत झाली नसल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) स्पष्ट केले. या घटनेची गंभीर दखल घेत प्राधिकरणाने संबंधित कंत्राटदाराला दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
आनंदनगर ते साकेतदरम्यान उन्नत मार्गाचे बांधकाम सुरू आहे. कोपरी पुलाजवळ या मार्गाच्या खांबाचे काम सुरू असताना लोखंडी सळ्यांच्या जाळ्याचा आधार सुटला आणि संपूर्ण सांगाडा अचानक खाली कोसळला. त्याच वेळी तेथून एक पांढऱ्या रंगाची सेडान कार जात होती. लोखंडी सांगाडा थेट कारवर पडल्याने वाहनाचा पुढील भाग, काच आणि छताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लोखंडी सळ्या कारच्या आतील भागापर्यंत घुसल्याने वाहन दबले गेले. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला असून, त्यात अपघातग्रस्त कार आणि मदतीसाठी धावलेले नागरिक व वाहतूक पोलीस दिसत आहेत.
अपघातानंतर कारमधील दोन जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त सुरुवातीला समोर आले होते. मात्र, एमएमआरडीएने अधिकृत स्पष्टीकरण देताना या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे सांगितले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. या घटनेमुळे मुंबई-ठाणे सीमेवरील महत्त्वाच्या मार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. प्रशासनाने क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त कार आणि लोखंडी सांगाडा बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.
या दुर्घटनेमुळे बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. एमएमआरडीएने संबंधित कंत्राटदारावर दोन कोटी रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई केली असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत. बांधकामादरम्यान सुरक्षा नियमांचे पालन करण्यात काही त्रुटी राहिल्या होत्या का, याचीही तपासणी केली जाणार आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांमध्ये सुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज या घटनेतून पुन्हा समोर आली आहे.


