पुणे प्रतिनिधी
पुणे : वडगाव बुद्रुक येथील शरदचंद्र पवार ई-लर्निंग स्कूलच्या तळघरात तात्पुरते स्थलांतरित करण्यात आलेले पुणे महापालिकेचे ‘मुद्रणमहर्षी मामाराव दाते’ मुद्रणालय पुन्हा घोले रस्त्यावरील मूळ जागेत आणण्याचे प्रशासनाने महापौर मंजूषा नागपुरे यांना कळविले आहे. मात्र, घोले रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या ‘सिटी लायब्ररी’च्या आराखड्यात मुद्रणालयासाठी जागाच ठेवण्यात आलेली नसल्याने प्रशासनाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
घोले रस्त्यावरील जागेवर ‘सिटी लायब्ररी’चा प्रकल्प उभारण्यासाठी दाते मुद्रणालय वडगाव बुद्रुक येथे हलविण्यात आले होते. या मुद्रणालयातून महापालिकेच्या विविध विभागांशी संबंधित महत्त्वाच्या कागदपत्रांची छपाई केली जाते. मात्र, शाळेच्या इमारतीमध्ये मुद्रणालय सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा निर्माण झाला होता. त्यामुळे हे मुद्रणालय तातडीने हलवावे, अशी मागणी महापौर नागपुरे यांनी प्रशासनाकडे केली होती.
महापौरांनी याबाबत प्रशासनाला यापूर्वी पत्रेदेखील दिली होती. मात्र, त्यावर निर्णय न झाल्याने नागपुरे यांनी स्वतः दाते मुद्रणालयाची पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी मुद्रणालय बंद करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर मुद्रणालयाला टाळे ठोकण्यात आले. या कारवाईची दृश्यफित समाजमाध्यमांवरही प्रसारित झाली.
टाळे लावल्यानंतर मुद्रणालयाचे काम ठप्प झाले. बुधवारी सकाळी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सध्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याचे महापौरांना सांगितले. त्यानंतर मुद्रणालयावरील टाळे काढण्यात आले. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हे मुद्रणालय दोन महिन्यांत पुन्हा घोले रस्त्यावरील मूळ जागेत आणण्यात येणार आहे.
मात्र, घोले रस्त्यावरील जागेवर सुरू असलेल्या ‘सिटी लायब्ररी’च्या आराखड्यात मुद्रणालयासाठी जागेची तरतूद नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दोन महिन्यांत मुद्रणालय मूळ ठिकाणी नेमके कसे सुरू केले जाणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
महापौर मंजूषा नागपुरे यांनी सांगितले की, वडगाव बुद्रुक येथील शाळेच्या इमारतीत मुद्रणालय असल्याने ते हलविण्याबाबत प्रशासनाला अनेकदा पत्रे देण्यात आली होती. मात्र, त्यावर कोणताही निर्णय घेतला जात नव्हता. प्रत्यक्ष पाहणी करून सूचना दिल्यानंतर प्रशासनाने मुद्रणालयाला कुलूप लावले.
विरोधी पक्षनेते निलेश निकम यांनी घोले रस्त्यावरील दाते मुद्रणालयाच्या जागेवर ‘सिटी लायब्ररी’चा प्रकल्प उभारण्यासाठी मुद्रणालय तात्पुरते हलविण्यात आल्याचे सांगितले. मुद्रणालयाचे पुन्हा घोले रस्त्यावरील जागेतच स्थलांतर होणे आवश्यक आहे. त्या ठिकाणी मुद्रणालय पुन्हा सुरू न झाल्यास ‘सिटी लायब्ररी’देखील सुरू होऊ देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेचे उपायुक्त माधव यांनी सांगितले की, मामाराव दाते मुद्रणालय पुन्हा मूळ जागेत आणण्यात येणार असून, दोन महिन्यांत स्थलांतर करण्याबाबत प्रशासनाने महापौरांना पत्र दिले आहे. बुधवारी मुद्रणालय सुरू होते. सध्या मूळ जागेवर बांधकाम सुरू असल्यामुळे ते वडगाव बुद्रुक येथे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आले आहे.


